थोरला भाऊ धाकट्याच्या डोळ्यादेखत होरपळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:12 AM2021-01-23T04:12:00+5:302021-01-23T04:12:00+5:30
नम्रता फडणीस लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीत आम्ही आठ जण कामासाठी गेलो होतो. पाच जण आतल्या ...
नम्रता फडणीस
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीत आम्ही आठ जण कामासाठी गेलो होतो. पाच जण आतल्या बाजूला होते. आम्ही काही अंतरावर काम करीत होतो. आग लागल्याचे कळताच मी वरच्या मजल्यावरून खाली उडी मारली. पण धूर खूप झाल्याने भाऊ बाहेर पडू शकला नाही. आग मोठी असल्याने इच्छा असूनही भावाला वाचवू शकलो नाही. माझ्या डोळ्यादेखत तो गेला,” हे सांगताना अविनाश सरोजचे अश्रू थांबत नव्हते.
सिरम इन्स्टिट्यूटच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर गुरूवारी (दि. २१) लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. यातील रमा शंकर हरीजन आणि बिपीन सरोज हे दोघे उत्तरप्रदेशचे तर सुशीलकुमार पांडे हा बिहारचा आहे. आगीत जळून भस्मसात झालेल्या महाराष्ट्राबाहेरील तिघांचे पार्थिव ससूनच्या शवागरात ठेवण्यात आले होते. त्यांचे कुटुंबीय आल्यानंतर शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी पाचच्या सुमारास ही पार्थिवे त्यांच्या ताब्यात देण्यात आली. ही तिन्ही पार्थिवे रूग्णवाहिकेतून त्यांच्या मूळ गावी नेण्याचा निर्णय या कुटुंबीयांनी घेतला.
आगीतून बचावलेल्या अविनाशने ‘आंखो देखा हाल’ ‘लोकमत’ला सांगितला. तो म्हणाला, “आम्ही चार भावंड. बिपीन हा माझा मोठा भाऊ. रमा हरीजन हा देखील आमच्या घरापासून काही अंतरावर राहणारा. काही वर्षांपूर्वी आम्ही पुण्यात कामानिमित्त आलो. गुरूवारी इमारतीमध्ये एसी बसविण्यासाठी आम्ही गेलो होतो. आग लागल्यावर आम्ही तिघांनी खालच्या मजल्यावर उडी मारली. आगीमुळे सगळीकडे धुर पसरला होता. पुढचे काहीही दिसत नव्हते. आम्ही फक्त मदतीसाठी हाका मारत राहिलो.”
“भाऊ डोळ्यादेखत होरपळला पण काही करु शकलो नाही. हा दिवस कधीच विसरू शकत नाही,” हे सांगताना अविनाशने हंबरडा फोडला. ससूनच्या शवागराबाहेर तिघांचा मित्र परिवार हजर होता. सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहात होते. कुणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. असा दिवस उगवेल असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते, अशीच सगळ्यांची भावना होती.