पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या २७ रिक्त पदांची निवडणूक झाली बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 04:59 PM2020-11-05T16:59:56+5:302020-11-05T17:00:32+5:30
काही सदस्यांनी माघार घेतल्याने सर्व समित्यांच्या रिक्त जागा बिनविरोध झाल्या..
पुणे : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सत्तावीस रिक्त जागांसाठी गुरुवारी (ता.५) निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. सर्वच समित्यांच्या रिक्त पदांची निवडणूक बिनविरोध झाली. पशुसंवर्धन समितीची एक तर कृषी समितीची एक अशा दोन जागा रिक्त राहिल्याचे पिठासन अधिकारी, अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी घोषित केले.
उपाध्यक्ष रणजित शिवतरे, सभापती प्रमोद काकडे, बाबुराव वायकर, पूजा पारगे, सारिका पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह गटनेते, विरोधीपक्षनेते, सदस्य उपस्थित होते.
बांधकाम समितीच्या तीन जागांसाठी सहा अर्ज, स्थायी समितीच्या दोन जागांसाठी पाच अर्ज, आरोग्य समितीच्या तीन जागांसाठी चार अर्ज, समाजकल्याण समितीच्या एका जागेसाठी दोन अर्ज, कृषी समितीच्या चार जागांसाठी पाच अर्ज दाखल झाले होते. यात काही सदस्यांनी माघार घेतल्याने सर्व समित्यांच्या रिक्त जागा बिनविरोध झाल्या.
पशुसंवर्धन समितीच्या चार जागांसाठी तीन अर्ज, अर्थ समितीच्या आठ जागासाठी सहा अर्ज दाखल झाल्याने या समितीची निवडणूक बिनविरोध झाली. पशुसंवर्धन समितीची एक तर अर्थ समितीच्या दोन जागा रिक्त राहिल्या. शिक्षण समितीच्या एक जागेसाठी शोभा कदम यांच्या एकच अर्ज, जलव्यवस्थापन समितीच्या एका जागेसाठी शेळके राणी यांचा एकमेव अर्ज आल्याने या दोन्ही जागा बिनविरोध झाल्याचे पिठासन अधिकारी निर्मला पानसरे यांनी घोषित केले.
विषय समितीनिहाय नवनिर्वाचित सदस्यांची नावे :
स्थायी समिती : वीरधवल जगदाळे, अंकुश आमले.
बांधकाम समिती : भरत खैरे, सुजाता पवार, भगवान पोखरकर.
आरोग्य समिती : विवेक वळसे-पाटील, पांडुरंग ओझरकर, जयश्री पोकळे.
समाजकल्याण समिती : कीर्ती कांचन
कृषी समिती : प्रवीण माने, संजय गवारी, नीता बारवकर (एक जागा रिक्त)
पशुसंवर्धन आणि दुग्ध समिती : विशाल तांबे, आशा शितोळे, मोनिका हरगुडे. (एक जागा रिक्त)
अर्थ समिती : विश्वास देवकाते, सुरेखा चौरे, अंकिता पाटील, श्रीधर केंद्रे, नलिनी लोळे, स्वाती शेंडे, दिनकर सरपाले, स्वाती शेंडे
शिक्षण समिती : शोभा कदम
जलव्यवस्थापन समिती : राणी शेळके