लसीकरण की प्रचार ? पुण्यात आता थेट नगरसेवकांचा नावाने लसीकरण केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 01:29 PM2021-05-27T13:29:27+5:302021-05-27T13:32:44+5:30
नगरसेवकांचा नावानी लसीकरण केंद्राचा वाटपाचे थेट आदेश
पुण्यात लसीकरणचा गोंधळ सुरू असतानाच आता चक्क लसीकरण केंद्र थेट नगरसेवकांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रसमोर चक्क नागरिकांची नावे टाकत नवी यादीच महापालिकेने जाहीर केली आहे. त्यातच भाजप नी आता थेट नगरसेवकांना खासगी रुग्णालयातून लस खरेदी करायला सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या सगळ्या प्रकारामुळे ही सगळी निवडणुकीची तयारी चालवली आहे का काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
अगदी काही दिवसांपूर्वीच नगरसेवकांनी लसीकरण केंद्र ताब्यात घेत थेट टोकन सिस्टीम सुरू केली म्हणत महापालिकेने कोणत्याही नगरसेवकाने केंद्रांवर हस्तक्षेप करू नये असे आदेश काढले होते. पण काहीच दिवसांत यावर थेट यू टर्न घेत आता नगरसेवकांना केंद्रांचा अधिकृत ताबाच दिला आहे. बुधवारी महापालिकेने एक नवीन आदेश काढला आहे ज्यात प्रत्येक नगरसेवकाला एक केंद्र वाटून देण्यात आले आहे. दवाखान्यातील केंद्र बंद करून आता खाजगी ठिकाणी केंद्र सुरू करायला देखील परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान भाजपने आता नगरसेवकांकडून लस देण्याचा घाट घातला आहे. भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खाजगी रुग्णालयांना मिळणाऱ्या लसीपैकी काही लसी खरेदी करतील आणि गरीब लोकांचे लसीकरण करतील असं देखील घोषित केले आहे.