पुणे | मावळातील नऊ ग्रामपंचायतीत निवडणुकीचे वाजले बिगुल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 01:15 PM2022-11-12T13:15:45+5:302022-11-12T13:20:01+5:30
निवडणुकीचे बिगुल वाजल्याने इच्छुक उमेदवार सक्रिय...
कामशेत (पुणे) : राज्य निवडणूक आयोगामार्फत सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणुका जाहीर करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींची यामध्ये समावेश असून निवडणुकीचे बिगुल वाजल्याने इच्छुक उमेदवार सक्रिय झाले आहेत.
मावळ तालुक्यातील सावळा, देवले, भोयरे, शिरगाव, वरसोली, इंदोरी, कुणे नामा, निगडे, गोडुंब्रे या गावांची ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदासाठी थेट नागरिकांमधून निवड करण्यात येणार आहे. जोपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये आचारसंहिता लागू असणार आहे. त्यासोबतच या दरम्यान मतदारांवर प्रभाव टाकणारी कुठलीही घोषणा उमेदवारांना करता येणार नाही.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शुक्रवारी (दि.१८) नोव्हेंबर रोजी तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करावयाची आहे. सोमवारी (दि.२८) नोव्हेंबर ते शुक्रवारी (दि.२) डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेमध्ये उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
सोमवार (दि.५) डिसेंबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल. बुधवार (दि.७) डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह नेमून अंतरिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. रविवारी (दि.१८) डिसेंबर रोजी सर्व ग्रामपंचायतचे मतदान सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत पार पडेल. त्यानंतर मंगळवारी (दि. २०) डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येईल.
प्रथमच लोकनियुक्त सरपंच होणार असल्याने राजकीय समीकरणे बदलली
मावळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमध्ये यंदा प्रथमच नागरिकांमधून सरपंच थेट निवडून जाणार असल्याने मतांची जुळणी करण्यासाठी उमेदवारांचे धावपळ सुरू आहे. गाव पातळीवर असणारे संबंध, नातीगोती आदीसह आतापर्यंत केलेल्या सामाजिक राजकीय कार्याच्या जोरावर राजकीय समीकरणे बांधण्यासाठी उमेदवारांची मोठी कसरत होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.
असा असणार निवडणूक कार्यक्रम
१८ नोव्हेंबर : निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध
२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत : उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
५ डिसेंबर : उमेदवारी अर्जांची छाननी
७ डिसेंबर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत
८ डिसेंबर : उमेदवारांना चिन्हाचे वाटप
१८ डिसेंबर : मतदान
२० डिसेंबर : मतमोजणी