गावात निवडणुकीचा ज्वर वाढला, उमेदवारांकडून करणी-भानामतीचा खेळ रंगला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 01:56 PM2020-12-23T13:56:20+5:302020-12-23T14:00:18+5:30

सन २०२० ते २०२५ या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेपासून सदस्यापदाच्या खुर्चीचे आतापासूनच अनेक जणांना स्वप्न पडू लागली आहेत.

The election fever in the village increased, the Karni-Bhanamati game was played by the candidates | गावात निवडणुकीचा ज्वर वाढला, उमेदवारांकडून करणी-भानामतीचा खेळ रंगला

गावात निवडणुकीचा ज्वर वाढला, उमेदवारांकडून करणी-भानामतीचा खेळ रंगला

Next

लोणी काळभोर :  नामनिर्देशनपत्रे स्विकारली जाणार असल्याने आजपासून निवडणूकीचा ज्वर उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. या धामधुमीत हवेली तालुक्यातील काही स्वयंघोषित उमेदवारांनी गेले १५ दिवसांसूनच बुवाबाजीचा आधार घेत, 'करणी' सारखा प्रकार सुरू केला आहे. इच्छूक उमेदवारांनी आपल्या राजकीय यशासाठी लिंबू, मिरच्या, काळ्या बाहुल्या, गंडा - दोरा, अंगारा - धुपारा यांचा आश्रय घेऊन आपले उपद्व्याप सुरू केले आहेत. राजकारणातील प्रतिष्ठेपायी ग्रामपंचायतीत विराजमान होण्यासाठी काहीजण 'चेटूक माटूक' करू लागल्यामुळे याची वेगळीच चर्चा परिसरात होऊ लागली आहे.

सन २०२० ते २०२५ या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेपासून सदस्यापदाच्या खुर्चीचे आतापासूनच अनेक जणांना स्वप्न पडू लागली आहेत. काही प्रभाग नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलांसाठी राखीव असले तरी यामधून कुणबी दाखल्यावरून अनेक दिग्गज आपल्या सौभाग्यवतींना रणांगणात उतरवणार असल्याने या निवडणुकीत पॉवरबाज व तुल्यबळ लढतीचे घमासान होणार आहे. या कुणबी दाखल्याची जादू असर दाखवणार आहे. त्याकामी येथील ग्रामपंचायतीतील माजी सदस्यांनी आपल्या सौभाग्यवतींचे कुणबी दाखले काढून पुढील रणनितीची खेळी सुरू करून आपले प्यादे तयारीला लावले आहेत. त्यातच या स्पर्धेतील काही महाभागांनी बुवाबाजी करणा-या महाराजांचा आश्रय घेऊन आपला 'उतारा' दाखवण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक गावांतील दोन परस्परविरोधी गटातील राजकीय ताकद व स्थानिक प्रस्थ ठरणार असल्याने तालुक्यातील वरिष्ठ व स्थानिक नेते उमेदवार ठरवण्याबाबत सावध पवित्रा घेत आहेत.           

बहुतांश गावातील राजकीय गटामध्ये नेहमीच उलथापालथ होत असल्यामुळे राजकारणात या गावांना वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच  तुल्यबळ उमेदवार असल्याने गेले काही दिवसांपासून इच्छुकांनी गावातील मान्यवरांच्या गाठी भेटी सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर अत्यंत गुप्तपणे अंगारा, धुपारा, टाचणी, लिंबू व बिबव्यासह देवाचा भंडारा काही जणांच्या घरासमोर टाकण्याचा प्रकार सुरू केला आहे. असाच एक प्रकार हवेली तालुक्यातील एका गावात पहावयास मिळाला आहे. आणि चक्क ग्रामपंचायत वरच लिंबू नारळ टाकून करणी करण्याचा प्रयत्न झाला आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणूकीचे वातावरण तापले आहे. अगोदरच २०२० हे वर्ष विविध कारणाने चर्चेत आहे त्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक फेरबदल होत असल्याने वातावरण अगोदरच तंग आहे त्यात हा एक नवीनच हास्यास्पद प्रकार चर्चेत आला आहे. पूर्व हवेलीतील एका मोठ्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या आवारात चक्क लिंबू नारळ गुलाल असे साहित्य टाकून अघोरी प्रकार करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत हा लिंबू व नारळ कोणाला भारी पडणार याचीच चर्चा सुरू झालेली आहे.

आपल्या राजकीय भवितव्यासाठी, यशाकडे वाटचाल ठेवण्यासाठी देव देवतांना कौल लावण्याचे प्रकार होत असून अनिष्ट प्रथेकडे काही पुढारी व त्यांचे कार्यकर्ते आकर्षित होत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात तेही पुणे शहरालगतच्या गावात असे प्रकार निदर्शनास येत असल्यामूळे सर्वसामान्याकडून याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी एकीकडे मोबाइलसारख्या अत्याधुनिक साधनाचा वापर सुरू असतानाच विरोधकांचा पाडाव करण्यासाठी करणी करण्यासारखे प्रकार उघडकीस येत असल्याने आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या मतदानात मतदारराजा  कुणाला कौल देतो हे १८ जानेवारी रोजी कळणार असले तरी या लढतीमध्ये विरोधकांना जादूटोणा करून पराभूत करण्याचे मनसुबे कुणी रचले ? लिंबू नारळाची पूजा कोणी मांडली ? याबाबत या गावातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात याची जोरदार चर्चा सुरू आहे. 
 

Web Title: The election fever in the village increased, the Karni-Bhanamati game was played by the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.