निवडणुकीचे प्रचार साहित्य बाजारात दाखल ; यंदा 'याला' जास्त मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 09:45 PM2019-04-01T21:45:17+5:302019-04-01T21:46:49+5:30
लाेकसभा निवडणूका जवळ येत असताना विविध निवडणुकीच्या साहित्यांना देखील मागणी वाढत आहे. दरवर्षी एक नवीन गाेष्ट निवडणुकीच्या काळात बाजारात दाखल हाेत असते. यंदा उपरणांचे विविध प्रकार बाजारात दाखल झाले आहेत.
पुणे : लाेकसभा निवडणूका जवळ येत असताना विविध निवडणुकीच्या साहित्यांना देखील मागणी वाढत आहे. दरवर्षी एक नवीन गाेष्ट निवडणुकीच्या काळात बाजारात दाखल हाेत असते. यंदा उपरणांचे विविध प्रकार बाजारात दाखल झाले आहेत.
निवडणुका म्हंटलं की, फेटे, झेंडे, कटआऊट या गाेष्टींना मागणी वाढते. प्रचारासाठी हे साहित्य आवश्यक असल्याने या काळात विविध पक्ष त्याप्रमाणे नियाेजन करत असतात. गेल्या काही वर्षांपासून बॅचेसला निवडणुकीच्या प्रचारात माेठे महत्त्व आले आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या काेटावर देखील कमळ चिन्हाचा बॅच असताे. तसेच काॅंग्रेसचे नेते सुद्धा हाताच्या पंचाचा बॅच वापरताना दिसून येतात. आता या बॅचेसमध्ये देखील बदल हाेत असून केवळ पक्षाचे चिन्ह नाही तर विविध घाेषवाक्यांचे बॅचेस देखील बाजारात दाखल हाेत आहेत. यंदा नमाे अगेन, मैं भी चाैकीदार ही घाेषवाक्य विशेष गाजली. या घाेषवाक्यांचे बॅचेस सुद्धा आता बाजारात उपलब्ध आहेत.
त्याचबराेबर यंदाचं वैशिष्ट म्हणजे, उपरणे. यंदा पक्षांच्या उपरणांमध्ये सुद्धा विविध प्रकार आले आहेत. कार्यकर्त्यांसाठी इकानाॅमी उपरणं, इतर नेत्यांसाठी सेटिंगचं उपरणं तर उमेदवारांसाठी खास शाही उपरणं तयार करण्यात आले आहे. याबाबत बाेलताना पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले या दुकानाचे गिरीश मुरुडकर म्हणाले, यंदा देखील निवडणुकीच्या साहित्याला प्रचंड मागणी आहे. झेंडे, कटाऊट, उपरणे यांची ऑर्डर येण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबराेबर 3 ते 6 फुटांचे ध्वजाची देखील मागणी करण्यात येत आहे. यंदा पक्षांसाठी विविध उपरणं बाजारात दाखल केली आहेत. या उपरणांनादेखील पक्ष पसंती देत आहेत.