१८४ ग्रामपंचायतींमधील १ हजार १३२ सदस्यांची निवड उद्या, ३७ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध
By नितीन चौधरी | Published: November 4, 2023 08:54 PM2023-11-04T20:54:06+5:302023-11-04T20:54:18+5:30
आता १८४ ग्रामपंचायतींमधील १ हजार १३२ सदस्यांची निवड रविवारी (दि. ५) होणाऱ्या मतदानानंतर निश्चित होणार आहे.
पुणे : जानेवारी ते डिसेंबर या काळात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायती व १४२ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, ८४९ सदस्यांची तसेच ४९ सरपंचांची बिनविरोध निवड झाली असून ३७ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता १८४ ग्रामपंचायतींमधील १ हजार १३२ सदस्यांची निवड रविवारी (दि. ५) होणाऱ्या मतदानानंतर निश्चित होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर या काळात मुदत संपणाऱ्या २३१ ग्रामपंचायत व १४२ ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार या ठिकाणी रविवारी मतदान होत आहे. निवडणूक प्रक्रियेनुसार २३१ ग्रामपंचायतींमधील २ हजार ४० सदस्य पदांसाठी निवडणूक होणार होती. माघारीच्या मुदतीनंतर एकच अर्ज आल्याने ८४९ सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे. त्यामुळे १८४ ग्रामपंचायतमधील १ हजार १३२ सदस्यांची निवड मतदारानंतर निश्चित होणार आहे. तर ५९ सदस्य पदांसाठी एकही अर्ज न आल्याने या जागा रिक्त राहणार आहेत. त्यात सर्वाधिक २४ जागा आंबेगाव तालुक्यात आहेत, भोर तालुक्यात १७ तर मुळशी तालुक्यातील ९ सदस्यपदे रिक्त राहतील.
भोर तालुक्यात सर्वाधिक १२ ग्रामपंचायती बिनविरोध
जिल्ह्यात ३७ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. सर्वाधिक १२ ग्रामपंचायती भोर तालुक्यातील असून मावळमधील ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मुळशी, आंबेगाव व पुरंदरमध्ये प्रत्येकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सरपंच तसेच सदस्यपदासाठी एकच अर्ज आल्याने जिल्ह्यातील दहा ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. त्यात मुळशी, जुन्नर व भोर तालुक्यातील प्रत्येकी २, मावळ १ व आंबेगाव तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
४९ ठिकाणी सरपंचपद बिनविरोध
मुळशी, वेल्हे व भोर तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीमधील सरपंचपदासाठी एकही अर्ज न आल्याने येथील सरपंचपद रिक्त राहणार आहे. तर ४९ ठिकाणी सरपंचपद बिनविरोध झाले आहे. भोर तालुक्यातील सर्वाधिक १३ ठिकाणी सरपंचपद बिनविरोध झाले आहे. आंबेगाव तालुक्यात ९, खेड तालुक्यात ८, जुन्नर तालुक्यात ६, मुळशीत ४, दौंड व बारामतीत प्रत्येकी १ व पुरंदरमध्ये तीन ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद बिनविरोध झाले आहे. त्यामुळे १७९ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी रविवारी मतदान होणार आहे.
पोटनिवडणुकीत २०४ पैकी १०६ पुन्हा रिक्त
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार १४२ ग्रामपंचायतीमधील २०४ रिक्त जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, १०६ ठिकाणी एकही अर्ज आला नसल्याने ही पदे पुन्हा रिक्त राहणार आहेत. तर ६३ सदस्यपदे बिनविरोध झाली आहेत. त्यामुळे २९ ग्रामपंचायतीमधील ३५ सदस्यपदांसाठी रविवारी मतदान होणार आहे. या ग्रामपंचायतीमधील ७ ठिकाणी सरपंचपदे रिक्त होती. त्यापैकी तीन ठिकाणी एकही अर्ज आला नसल्याने ही पदे रिक्त राहतील, तर दोन ठिकाणी एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दोन ठिकाणी सरपंचपदासाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे.