Milk Association Election: अखेर जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर; 20 मार्चला होणार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 09:42 PM2022-02-11T21:42:13+5:302022-02-11T21:42:38+5:30
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी 14 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे
पुणे : सात वर्षांच्या प्रतिक्षेतनंतर पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच कात्रज डेअरीच्या संचालक मंडळाची निवडणूक 20 मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी 14 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्र सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद सोबले यांची नियुक्ती केली. सोबले यांनी सहकारी निवडणूक प्राधिकरणाला सादर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी दिल्याचे पत्र प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिले आहे.
संघाच्या संचालक पदाच्या 16 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड ,शिरूर ,मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर आणि दौंड या अकरा तालुक्यांसाठी दूध उत्पादक सोसायटी यांचा प्रत्येकी एका गटातून एक संचालक निवडला जाईल. महिला संचालकासाठी दोन जागा असून , अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती आणि इतर मागास वर्गासाठी प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होईल.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
- उमेदवारी अर्ज दाखल करणे : 14 ते 18 फेब्रुवारी
- उमेदवारी अर्जांची छाननी : 21 फेब्रुवारी
- वैध उमेदवारांची यादी जाहीर करणे : 22 फेब्रुवारी
- उमेदवार अर्ज मागे घेणे : 22 फेब्रुवारी ते 8 मार्च
- चिन्ह वाटप : 9 मार्च
- मतदान : 20 मार्च सकाळी 9 ते सायंकाळी 5
- मतमोजणी : 21 मार्च