जिल्ह्यातील ११ नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:15 AM2021-08-24T04:15:05+5:302021-08-24T04:15:05+5:30
- आता एकसदस्यीय पध्दतीने होणार निवडणुका लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील भोर आणि वडगाव मावळ नगरपालिका वगळता जिल्ह्यातील ...
- आता एकसदस्यीय पध्दतीने होणार निवडणुका
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील भोर आणि वडगाव मावळ नगरपालिका वगळता जिल्ह्यातील अन्य सर्व अकरा नगरपालिकांची निवडणूक तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 अखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या सर्व नगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांची प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू आहे. भाजप सरकारने केलेली बहुसदस्यीय पध्दत रद्द करून एकसदस्यीय प्रभाग रचना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि तीन नगरपंचायती सध्या अस्तित्वात आहेत. यापैकी भोर आणि वडगाव मावळ नगरपालिकेची अद्याप दोन अडीच वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. तर चाकण आणि राजगुरुनगर नगरपालिकेची मुदत एक वर्षापूर्वी संपली असून, येथे सध्या प्रशासक आहे. तर बारामतीसह इंदापूर, जेजुरी, सासवड, दौंड, शिरूर, जुन्नर, आंळदी, तळेगाव यांची मुदत देखील संपत आहे. या सर्व नगरपालिकांच्या प्रभाग रचना तयार करण्याची प्रकिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी 2011 चीच जनगणना गृहीत धरण्यात येणार आहे. यामुळेच मात्र लोकसंख्या वाढली असताना देखील नगरसेवकांची संख्या मात्र पूर्वी प्रमाणेच राहणार आहे.
------
नगरपालिकासाठी चार ऐवजी एकच प्रभाग
भाजप सरकारने महापालिकांसह सर्व नगरपालिकांसाठी बहुसदस्यी पध्दतीने प्रभाग रचना करून एका प्रभागातून तब्बल चार नगरसेवकांना संधी दिली होती. परंतु राज्यातील महाआघाडी शासनाने नगरपालिकांसाठी एकसदस्यी पध्दतीनेच निवडणूक घेण्याचे निश्चित केले असून, त्यानुसार प्रभाग रचना तयार करण्याचे काम सध्या जिल्ह्यात सुरू आहे.
------
या नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचे काम सुरू
बारामती, जेजुरी, सासवड, दौंड, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आंळदी, तळेगाव, चाकण, राजगुरुनगर
-------