कोरोनामुळे रखडलेल्या पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 12:33 PM2020-10-21T12:33:13+5:302020-10-21T12:35:00+5:30
पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत . सध्या ६४२ ग्रामपंचायतींवर शासनाने प्रशासक नियुक्त केले आहेत.
पुणे : पुणे जिल्ह्यातील जुलै ते डिसेंबर २०२० अखेर दरम्यान मुदत संपणाऱ्या, परंतु कोरोना महामारी व लाॅकडाऊनमुळे रखडलेल्या तब्बल ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला अखेर सुरूवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित केला असून अंतिम प्रभाग रचना दोन नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहेत.
डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रभाग रचना कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. परंतु कोरोनामुळे १७ मार्च रोजी या कारवाईला स्थगिती देण्यात आली होती. राज्यातील कोरोना परिस्थितीमध्ये सुधारणा झाली असून शासनाने अनलॉक संदर्भात वेगवेगळे आदेश देखील जारी केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी २७ ऑक्टोबर पर्यंत सह्या करून निश्चित करावा. त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी प्रभाग रचनेची अंतीम प्रसिद्धी करण्यास सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत सध्या ६४२ ग्रामपंचायतींवर शासनाने प्रशासक नियुक्त केले आहेत. गाव कारभार यांना निवडणुकांचे वेध लागले असून राज्य निवडणूक आयोगाने आता प्रभाग रचना अंतिम करण्याचा निर्णय घेतल्याने लवकरच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.