खेड, मावळ तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवड १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:13 AM2021-02-09T04:13:23+5:302021-02-09T04:13:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खेड आणि मावळ तालुक्यांतील काही ग्रामपंचायतींनी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खेड आणि मावळ तालुक्यांतील काही ग्रामपंचायतींनी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार या दोन्ही तालुक्यांतील सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अन्य अकरा तालुक्यांत मात्र निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसारच म्हणजे ९ आणि १० फेब्रुवारीलाच होणार असल्याची माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील एकूण ७४६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या सभेत सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडीचे आदेश दिले होते. परंतु खेड तालुक्यांतील मेदनकरवाडी, बिरदवडी, नाणेकरवाडी व मावळ तालुक्यातील परंदवडी या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयत रिट याचिका दाखल झाल्या आहेत. सदर याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सदर याचिकाकर्त्यांना मंगळवारी (दि. ९) सकाळी ११ वाजता सुनावणीकरिता जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्यास व ९ आणि १० फेब्रुवारी या कालावधीतील सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक न घेता १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्याचे आदेश दिले असल्याचे चव्हाण म्हणाले.
चौकट
मंगळवार-बुधवारी निवड
हवेली, मुळशी, भोर, वेल्हा, बारामती, इंदापूर, दौंड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि पुरंदर या अकरा ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच निवडी ठरल्याप्रमाणे ९ व १० फेब्रुवारीलाच होणार असल्याचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले.