पुणे जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींवर निवडणुकीची टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 01:02 PM2020-12-22T13:02:07+5:302020-12-22T13:02:56+5:30
शासनाचे आदेश येत नाही तोपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया सुरूच राहणार
पुणे : जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होत असून, उमेवारी अर्ज दाखल करण्यास बुधवार दि. 23 डिसेंबर पासून सुरुवात होत आहे. परंतु हवेली तालुक्यातील शेवाळवाडी, औताडे-हंडेवाडी आणि वडाचीवाडी या तीन ग्रामपंचायतीचा पुणे महापालिकेत समाविष्ट होणे बाबत, तर बारामती तालुक्यातील माळेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद होण्याबाबत अद्याप शासनाकडून कोणतेही स्पष्ट आदेश आले नाहीत.यामुळे या पाचही ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम ठरल्यानुसार सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
पुणे शहरालगतची 23 गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यासंदर्भात शासन स्तरावर जोरदार हलचाली सुरू आहे. येत्या काही दिवसांत या संदर्भात अंतिम आदेश येतील अशी देखील चर्चा आहे. या 23 गावांपैकी हवेली तालुक्यातील शेवाळवाडी, औताडे-हंडेवाडी आणि वडाचीवाडी या तीन ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. तसेच बारामती तालुक्यातील माळेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद होणार आहे. परंतु अद्याप या पाचही ग्रामपंचायती संदर्भात शासनाकडून कोणतेही स्पष्ट आदेश आले नाहीत. यामुळे या पाचही ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुका घेण्यात येणार आहेत. दरम्यान शासन आथवा राज्य निवडणूक आयोगाकडून कोणत्याही स्वरूपाचे आदेश आले तरी निवडणूक प्रक्रिया आहे तेथे थांबता अथवा रद्द करता येऊशकते असे अधिकृत सुत्रांनी सांगितले.