छोट्या कार्यक्रमांतही निवडणुकीचे पडघम
By admin | Published: January 24, 2016 02:04 AM2016-01-24T02:04:19+5:302016-01-24T02:04:19+5:30
महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालींनाही वेग आला आहे. शहरात होणाऱ्या विकास प्रकल्पांच्या, तसेच इतर छोट्या-मोठ्या
पिंपरी : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालींनाही वेग आला आहे. शहरात होणाऱ्या विकास प्रकल्पांच्या, तसेच इतर छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमधील भाषणांमध्ये राजकीय नेते निवडणूक डोळ्यांसमोर धरून वक्तव्य करू लागले आहेत.
पुढील वर्षी फेबु्रवारी महिन्यात महापालिका निवडणूक होईल. त्यासाठी इच्छुकांची जोरदार तयारी झाली सुरू आहे. यंदाची निवडणूक द्विसदस्यीय प्रभागपद्धतीने होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँगे्रसची एकहाती सत्ता आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रससह भाजपा, शिवसेना, काँगे्रस यांनीही कंबर कसली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शहरात लक्ष घालण्यास सुुरुवात केली आहे. छोट्या-मोठ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची शहरात वर्दळ सुरू झाली आहे. शहरातील सध्याच्या राजकीय स्थितीसह विविध घटनांचा आढावा घेतला जात आहे. तसेच अप्रत्यक्षरीत्या उमेदवारांचीदेखील चाचपणी सुरू आहे.
यापूर्वी राजकीय नेते शहरात आल्यानंतर विकासाच्या मुद्द्यांवर बोलत. आता प्रतिस्पर्ध्यांवर टीका-टिप्पणी होऊ लागली आहे. वक्तव्य करून गेलेल्या नेत्याला संबंधित नेत्याचे प्रत्युत्तर तयार असते. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच नेत्यांनी पक्षबांधणीला महत्त्व दिले आहे, तर इच्छुक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांची लगबग, लुडबुड वाढली आहे. प्रभागाची रचना कशी असेल, कोणता भाग कोठे जोडल्यास आपल्याला फायदा होईल, मतदारयाद्यांची चाचपणी आदी कामे सुरूझाली आहेत. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने एखादा कार्यक्रम आयोजित करायचा आणि त्या कार्यक्रमासाठी आपल्या स्थानिक नेत्याला निमंत्रित करण्याचा फंडा अवलंबिला जात आहे.
(प्रतिनिधी)