पाच राज्यांमध्ये निवडणुकांचा कौल भाजपाच्या विरोधात, जनताच BJP ला बाजूला करेल- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 09:18 AM2023-10-23T09:18:29+5:302023-10-23T09:20:45+5:30

पवार म्हणाले की, जरांगे पाटील आणि सरकारमध्ये काही सुसंवाद झाल्याचे व सरकारने वेळ घेतल्याचे दिसते....

Elections in five states are against BJP, people will sideline BJP - Sharad Pawar | पाच राज्यांमध्ये निवडणुकांचा कौल भाजपाच्या विरोधात, जनताच BJP ला बाजूला करेल- शरद पवार

पाच राज्यांमध्ये निवडणुकांचा कौल भाजपाच्या विरोधात, जनताच BJP ला बाजूला करेल- शरद पवार

बारामती (पुणे) : सध्या निवडणुका लागलेल्या पाच राज्यांमध्ये भाजपाला लोक बाजूला करतील, असे चित्र आहे. सध्या बदल करण्याची भावना देशामध्ये आहे. देशातील ७० टक्के राज्यांमध्ये भाजप नाही. अन् जिथे या निवडणुका आहेत, तिथे निवडणुकांचा कौल भाजपाच्या विरोधात असल्याचे दिसते, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

पवार हे रविवारी बारामती (दि. २२) दाैऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी निवडणुकीवर भाष्य केले. तसेच ५१ टक्के मते घेऊन आम्ही बारामती जिंकणार, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वारंवार म्हणत असतात. यावर पवारांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, बारामतीचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही. अखंड देशाला बारामतीचे महत्त्व माहिती आहे. म्हणूनच ते वारंवार बारामतीचे नाव घेतात, असे पवार म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांचे जनमानसात आणि पक्षात काय स्थान आहे, मला माहीत नाही. ज्या व्यक्तीला स्वत:चा पक्ष उमेदवारीसाठी योग्य समजत नाही, त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. त्यांना भाजपनं तिकीट नाकारलं. त्यामुळे त्यांच्याबाबत काही बोलू नये, असे म्हणत पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना टोला लगावला.

प्रश्न सुटला तर मनापासून आनंद

पवार म्हणाले की, जरांगे पाटील आणि सरकारमध्ये काही सुसंवाद झाल्याचे व सरकारने वेळ घेतल्याचे दिसते. याबाबत सरकार काय करते आहे, याकडे आमचे लक्ष आहे. या दोन दिवसानंतर सरकारची भूमिका स्पष्ट होईल, असं दिसत आहे. यातून मार्ग निघाला, प्रश्न सुटला तर मनापासून आनंद होईल, असे पवार म्हणाले.

कंत्राटी पद्धतीने जागा भरणे योग्य नाही

कंत्राटी भरतीबाबत बोलताना पवार म्हणाले, मी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नाही. जाण्याचे काय कारण नाही. महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री आहेत. एकाच मत तुम्ही सांगितलं. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी आज त्याच्यावर टिप्पणी केली आहे. त्यात हे स्पष्ट दिसते की, ज्या वेळेला त्यासंबंधीचा निर्णय घेतला गेला, त्या निर्णयाच्या बैठकीला अनेक सहकारी हजर होते. ते आजही सरकारमध्ये आहेत. त्यावेळी त्यांची संमती होती. आज त्यासंबंधीचं भाष्य करत नाहीत. कंत्राटी कामगारांच्या संबंधीची अस्वस्थता कशाची होती. नोकरीमध्ये शाश्वती नाही. ठराविक काळासाठीच नोकरी आहे. दहा-अकरा महिन्यांची नोकरी म्हटल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनात स्थैर्य नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जागा भरणे योग्य नाही. हा आमचा आग्रह होता, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. याविषयी बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, इंडिया आघाडीमध्ये जे-जे लोक सहभागी होतील, त्याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. मात्र, कालची बैठक ही त्यासाठी नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपीज’ या ग्रंथाला शंभर वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरला कार्यक्रम होता. या संदर्भासाठी आम्ही एकत्रित होतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Elections in five states are against BJP, people will sideline BJP - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.