निवडणुका होणार चुरशीच्या
By admin | Published: July 23, 2015 04:49 AM2015-07-23T04:49:17+5:302015-07-23T04:49:17+5:30
भोर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बहुतांशी गावांत प्रस्थापितांच्या विरोधात तरुण कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या
भोर : भोर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बहुतांशी गावांत प्रस्थापितांच्या विरोधात तरुण कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतल्याने अनेक ठिकाणच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार असून स्वत:ची ग्रामपंचायत पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
भोर तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ५०६ तर पोटनिवडणुक लागलेल्या ४८ ग्रामपंचायतीच्या ८८ जागा अशा एकूण ११८ ग्रामपंचायतीच्या ५९६ जागांसाठी निवडणुका होत असुन १,७३३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली होती; त्यापैकी १,३३७ उमेदवारी अर्ज जमा करण्यात आले. काल झालेल्या छाननीत ४३ अर्ज बाद झाल्याने ५०६ जागांसाठी १,२९३ उमेदवारी अर्ज असून माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
माजी उपसभापती विक्रम खुटवड यांच्या विशेष प्रयत्नामुळे त्यांची हातवे खुर्द ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून गुंजवणी भागातील काही गावे बिनविरोधच्या मार्गावर आहेत. पुणे-सातारा महामार्गावरील सर्वांत मोठी असणाऱ्या वेळू ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी ३६ उमेदवार असून माजी उपसभापती अमोल पांगारे यांनी भैरवनाथ विकास पॅनेलच्या माध्यमातून मागील तीन वर्षांत गावात झालेल्या विविध विकास कामांच्या जोरावर सर्व ११ जागा लढवणार आहेत. तर त्यांच्या विरोधात माजी सरपंच ज्ञानेश्वर पांगारे यांचा पॅनेल आहे. माजी बांधकाम व आरोग्य सभापती रणजित शिवतरे यांचे उत्रौली ग्रामपंचायतीवर प्रथम पासूनच एकाहाती वर्चस्व असून विरोधकांना आतापर्यंत एकही जागा मिळवता आलेली नाही. येथे ११ जागांसाठी २७ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे व दिलीप बाठे यांच्यात केंजळ ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीत चुरस आहे. मात्र चंद्रकांत बाठे यांनी प्राथमिक शाळा, गार्डन, सौरऊर्जा पार्क याचबरोबर गावातील विकास कामांमुळे ही निवडणूक जिंकण्याचा विश्वास आहे. दरवेळी बिनविरोधची परंपरा असणारे केळवडे गावात या वेळी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे व माजी सदस्य शिवाजी कोंडे यांच्यात दोन पॅनेल आमनेसामने असून दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली असून ७ जागांसाठी ३० उमेदवारी अर्ज आहेत. जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांचे न्हावी १५ ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज आहेत. तर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, के. डी. सोनवणे यांचे न्हावी ३२२ ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी २७ उमेदवारी अर्ज आहेत. आंबाडे ग्रामपंचायतीवर बाजार समितीचे सभापती प्रदीप खोपडे यांचे मागील दहा वर्षांपासून वर्चस्व आहे. येथील ७ जागांसाठी २९ उमेदवार असून दोन पॅनेलमध्ये लढत होत आहे.
माजी सभापती अण्णासाहेब भिकुले यांचे खोपी गावात शिवसेना विरुध्द कॉंग्रेस अशी दुरंगी लढत होत आहे. महामार्गावरील मोठी बाजारपेठ भोर वेल्हाचे मध्यवर्ती ठिकाण यामुळे नसरापूर ग्रामपंचायत महत्त्वाची आहे. ग्रामपंचायतीवर मागील निवडणुकीत मुरलीधर दळवी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने विजय मिळवला होता. या वेळी मात्र त्यांना शिवसेनेच्या प्रकाश चाळेकर यांनी कडवे आव्हान उभे केले असून राष्ट्रवादीनेही पॅनेल उभा केल्याने तिरंगी लढत होत आहे. ११ जागांसाठी ४१ अर्ज दाखल झाले आहेत (वार्ताहर)