समाविष्ट होणाऱ्या तिन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:11 AM2020-12-24T04:11:56+5:302020-12-24T04:11:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. उमेवारी अर्ज दाखल करण्यास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. उमेवारी अर्ज दाखल करण्यास बुधवार (दि. २३) डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. परंतु, यापैकी हवेली तालुक्यातील २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यासंदर्भात बुधवारीच प्रायमरी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. हे नोटिफिकेशन अंतिम नसल्याने महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या शेवाळवाडी, औताडे-हंडेवाडी आणि वडाचीवाडी या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे शहरालगतची २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यासंदर्भात शासन स्तरावर जोरदार हलचाली सुरू होत्या. सध्या या २३ पैकी तीन ग्रामपंचायतीसह जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकाचा कार्यक्रम सुरू आहे. परंतु, ही २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात बुधवारी निर्णय घेतला असला तरी अंतिम नोटिफिकेशन जाहीर केले नाही. यामुळे सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका ठरलेल्या कार्यक्रमानुसार होणार आहेत.