इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर संघटना : काम बंदचे आदेश दिल्याच्या निषेधार्थ उपोषणाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 12:22 AM2018-12-25T00:22:40+5:302018-12-25T00:22:55+5:30
जिल्ह्यातील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स संघटनेच्या सदस्याला महावितरणने बेकायदेशीरपणे काम बंदचे आदेश दिल्याच्या निषेधार्थ २६ डिसेंबरपासून वीज महावितरणच्या विरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा
आळंदी - जिल्ह्यातील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स संघटनेच्या सदस्याला महावितरणने बेकायदेशीरपणे काम बंदचे आदेश दिल्याच्या निषेधार्थ २६ डिसेंबरपासून वीज महावितरणच्या विरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष गिरीश बक्षी यांनी न्याय्य हक्कांसाठी दिला असल्याचे सांगितले.
वीज महावितरण कंपनीच्या रास्ता पेठेतील कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात येणार
आहे. १.३ टक्के योजनेंतर्गत ग्राहकांचे वैयक्तिक काम करणारे संघटनेचे सभासद मेसर्स न्यू सिमरन
इंटरप्रायझेस संस्थेचे संचालक संतोष सौंदणकर यांनी मुख्य
अभियंता, महावितरण पुणे यांच्या अखत्यारीतील परिमंडलातील केंद्राच्या इन्फ्रा योजनेत झालेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने आकसापोटी नियमबाह्य पद्धतीने काम बंदचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे काम ठप्प होणार आहे.
महावितरणच्याविरोधात नाराजी
२२ नोव्हेंबर २०१८ रोजी वीज महावितरणच्या मुख्य अभियंत्यांची भेट घेत संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले होते. यावेळी मुख्य अभियंत्यांशी झालेल्या चर्चेनुसार जारी केलेल्या काम बंदच्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काम परत सुरू करण्याचे आदेश न दिल्यास बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी अभियंत्यांनी मागण्यांचा विचार करण्याची ग्वाही दिली. मात्र अजूनपर्यंत काम बंदचे आदेश मागे घेतले नसल्याने संघटनेत नाराजी आहे.
विद्युत सनियंत्रण जिल्हा समिती सदस्य संतोष सौंदणकर यांनी महावितरणमधील भ्रष्टाचार उघड केला. यामुळे संघटनेच्या मागण्यांचा विचार करण्यास वेळ लावत आहे. वीज महावितरण काम बंदचे आदेश मागे घेण्याची मागणी मान्य न झाल्यास तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा बक्षी यांनी दिला आहे.