विद्युत निरीक्षकाला लाच घेताना अटक
By admin | Published: February 16, 2015 04:32 AM2015-02-16T04:32:31+5:302015-02-16T04:32:31+5:30
इमारतीचा विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राची ‘आर्थिंग वायर’ उखडून पाहण्याची धमकी देत, लाच स्वीकारणा-या सहायक विद्युत निरीक्षकाला
भिगवण : इमारतीचा विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राची ‘आर्थिंग वायर’ उखडून पाहण्याची धमकी देत, लाच स्वीकारणाऱ्या सहायक विद्युत निरीक्षकाला लाचलुचपत खात्याकडून रंगेहाथ पकडण्यात आले.
पुणे येथील लाचलुचपत विभागाचे सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उप-अधीक्षक प्रकाश शिंदे यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. भिगवण येथील एका रहिवाशी इमारतीला विद्युत पुरवठा हवा होता. यासाठी मुख्य विद्युत वाहिनीतून हा पुरवठा जोडण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक होते. तक्रारदाराने पुणे विद्युत निरीक्षक कार्यालयाकडे परवानगी घेण्यासाठी गुरुवारी (दि. १२) अर्ज दाखल केला होता. या वेळी लोकसेवक कोटलगी यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली. अन्यथा, ‘आर्थिंग वायर’ उखडून पाहण्याची धमकी दिली. नाखुशीने तडजोड करून तक्रारदाराने भिगवणला रक्कम देण्याचे मान्य केले. तसेच, लाचलुचपत खात्याकडे तक्रार दाखल केली. शुक्रवारी (दि. १३) संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी लाचलुचपत खात्याकडून सापळा रचण्यात आला.