पुणे विभागातील अडीच लाख ग्राहकांची वीज गुल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 12:39 PM2019-08-07T12:39:16+5:302019-08-07T12:42:57+5:30
पुणे शहर, पिंपरी-चिचंवड येथील १८९ रोहित्रे बाधित झाली आहेत. त्यामुळे ३० हजार १४३ ग्राहकांना त्याचा फटका बसला.
पुणे : पुणे, कोल्हापूर आणि सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने घातलेल्या थैमानामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणच्या तब्बल साडेआठ हजार रोहित्रांचे नुकसान झाल्याने, सोमवारपासून विविध ठिकाणची वीज सेवा विस्कळीत झाली आहे. पुणे विभागातील तब्बल अडीच लाख ग्राहकांची बत्ती गुल झाली असून, त्यात पुणे शहर आणि ग्रामीण भागातील ६० हजार ग्राहकांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यातील खडकवासला साखळीत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तब्बल साडेपंचेचाळीस हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठचा भाग पाण्याखाली गेला होता. अनेक झोपडवस्ती आणि सोसायट्यांमधे पाणी गेल्याने १३ हजारांवर नागरिकांना स्थलांतरित करावे लागले. या पाण्याचा फटका महावितरणच्या रोहित्रांनादेखील बसला. रोहित्र पाण्याखाली गेल्याने येथील वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे पुणे शहर, पिंपरी-चिचंवड येथील १८९ रोहित्रे बाधित झाली आहेत. त्यामुळे ३० हजार १४३ ग्राहकांना त्याचा फटका बसला. ग्रामीण भागातील तितक्याच ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
कोल्हापुरात आणि सांगलीलाही पुराचा फटका बसला आहे. कोल्हापुरातील पावणेचार हजार रोहित्रांचे पुराने नुकसान केले आहे. त्यामुळे एक लाखांवर ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. खालोखाल सांगलीला फटका बसला आहे. पुराच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर वीजपुरवठा कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जातील, अशी माहिती राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी दिली.
......
पुरामुळे बाधित रोहित्रे आणि ग्राहक
जिल्हा रोहित्रांची संख्या ग्राहकसंख्या
पुणे, पिंपरी-चिंचवड १८९ ३०,१४३
पुणे ग्रामीण २३०० ३०,२५२
सातारा ८७३ २४,१८६
सांगली १०७१ ५८,७५५
कोल्हापूर ३७९२ १,०७,५५३
सोलापूर २१६ २,३३५
एकूण ८,४४१ २,५३,२२४.
............