विद्युतवाहिनीच्या धक्क्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:12 AM2021-02-12T04:12:30+5:302021-02-12T04:12:30+5:30
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील घटना लोकमत न्यूज नेटवर्क तळेगाव दाभाडे : नवलाख उंबरे हद्दीतील बधलवाडी शिवारात गुरुवारी (दि.११) सकाळी ...
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव दाभाडे : नवलाख उंबरे हद्दीतील बधलवाडी शिवारात गुरुवारी (दि.११) सकाळी सहा फ्लेमिंगो पक्षी मृतावस्थेत आढळून आले. उच्चदाब विद्युतवाहिनीच्या तारेचा धक्का बसून या पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मादी आहेत.
रमेश बबन दहातोंडे यांना बधलवाडी येथील गबाजी नाथा दहातोंडे यांच्या शेतात हे पक्षी मृतावस्थेत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आले. त्यांनी याबाबत वन्यजीवरक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष नीलेश संपतराव गराडे यांच्याशी संपर्क साधला. गराडे यांनी वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांना घटनेची माहिती दिली. यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. काही पक्ष्यांचे पंख, काहींचे पाय तर, काहींचे मान तुटली होती. पक्ष्यांना शॉक बसल्याने मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांचा काही भाग जळाला होता. फ्लेमिंगो पक्षी स्थलांतरित होत असताना अधिक संख्येने असतात. त्यामुळे उड्डाणादरम्यान त्यांचा उच्चदाबाच्या दोन तारांमध्ये संपर्क आला असावा. त्यामुळे हे सहाही पक्षी मृत्युमुखी पडले आहेत, अशी महिती गराडे यांनी दिली.
शीतलकुमार मुकणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे, मावळचे पशुधन अधिकारी डॉ. अंकुश देशपांडे, डॉ. नितीन मगर यांनी घटनस्थळाला भेट दिली. त्यानंतर तळेगाव दाभाडे येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.