व्यायामाच्या साधनावर बसला विजेचा तीव्र झटका; तेवीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 12:05 PM2023-03-21T12:05:40+5:302023-03-21T12:32:13+5:30
व्यायामाच्या साधनांवर बसून फोनवर बोलत असताना युवक अचानकपणे शॉक लागून खाली कोसळला
बावधन : व्यायामाच्या साधनावर बसल्यावर विजेचा तीव्र झटका लागून युवकाचा जागीच मृत्यू झाला. अमोल शंकर नाकती (वय २३ वर्ष) राहणार भूगाव, दौलत पेट्रोल पंपाचया पाठीमागे, ता. मुळशी असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. हि घटना कोथरूड येथील पौड रोडवरील संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळाच्या मैदानावर घडली.
याबाबतची माहिती अशी, अमोल नाकती हा युवक या मंडळांचा कार्यकर्ता आहे. तो रोज नित्यनियमाने याठिकाणी येत असतो. पौड रस्त्यावरील संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळाच्या मैदानावर मित्रांशी भेटल्यावर मैदानात व्यायामासाठी आला. त्याचवेळी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास येथील मैदानावर लावलेल्या व्यायामाच्या साधनांवर बसून फोनवर बोलत होता. त्यावेळी तो अचानकपणे शॉक लागून खाली कोसळला. अगदी हाकेच्या अंतरावर त्याचे मित्र होते. दोन मिनिटांनी त्यांनी पाहिले असता हा खाली पडला होता. त्यानंतर मित्रांनी त्याला सह्याद्री हॉस्पिटल दाखले केल्यावर डॉक्टरांनी तो मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनास्थळी कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, अग्निशमन अधिकारी पाथरकर, विद्युत वितरण अधिकारी साळुंखे, नगरसेविक अल्पना वर्षे, प्रशांत कनोजिया अदिनी भेट दिली.