महावितरण उभारणार विद्युत वाहन चार्जिंग केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 04:41 PM2018-09-20T16:41:08+5:302018-09-20T16:44:28+5:30
महावितरणने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्याच्या प्रस्तावास तत्वत: मंजुरी दिली आहे.
पुणे: भविष्यातील विद्युत वाहनांचा वाढता वापर लक्षात घेता महावितरणने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्याच्या प्रस्तावास तत्वत: मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे,मुंबईसह नागपूरमध्ये टप्प्या टप्प्याने यासाठीचे आवश्यक प्रकल्प राबविले जाणार आहेत.
केंद्र शासनाने विद्युत वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे स्वतंत्र इलेक्ट्रीक व्हेहिकल प्रोत्साहनपर धोरण २०१८ तयार करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी त्यासाठीचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. महावितरणतर्फे मुंबईत ४, ठाणे येथे ६, नवी मुंबईत ४, पनवेलमध्ये ४, पुण्यात १० तर मुंबई-पुणे महामार्ग-१२ आणि नागपूरमध्ये १० प्रकल्प टप्प्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासाठीच्या निविदा अंतिम टप्प्यात असुन आठवडयाभरात कार्यादेश देण्यात येणार आहे. नागपूर येथील अमरावती रोड उपकेंद्र आणि पुणे येथील पॅराडीगम उपकेंद्र प्रत्येकी एक फास्ट डीसी चार्जिंग केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र लवकरच कार्यान्वित होणार आहे.
एका विद्युत वाहन चार्जिंग केंद्रासाठी महावितरणला सुमारे २ लाख ५० हजार रुंपये खर्च येण्याची शक्यता आहे. मुंबई वगळता राज्यात विजेचा पुरवठा महावितरण करीत असल्याने महावितरणने राज्यात विविध ठिकाणी विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्याचे निश्चित केले आहे. विद्युत वाहन चार्जिंग केंद्र महावितरणच्या उपकेंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त जागेत उभारण्यात येणार आहेत. तसेच तेथे विद्युत वाहन चार्जिंग केंद्र हे फास्ट डीसी चार्जिंग केंद्र असणार आहे. या केंद्र्रात एका विद्युत वाहनास पूर्ण चार्जिंग करण्यासाठी अंदाजे ४५ मिनिटे ते १ तास एवढा कालावधी लागणार आहे. विद्युत वाहन चालकांना प्रति युनिट ६ रुपये दर टीओडी तत्वावर चार्जिंगसाठी आकारण्यात येणार आहे.