वीज बिल भरता येणार बारा हप्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:31 AM2020-12-04T04:31:46+5:302020-12-04T04:31:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीतील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने ग्राहकांना तीन ते बारा हप्त्यामध्ये वीज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीतील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने ग्राहकांना तीन ते बारा हप्त्यामध्ये वीज बिल भरण्याची सवलत देऊ केली आहे. थकबाकी पैकी २ टक्के रक्कम भरुन या योजनेत सहभागी होता येणार आहे.
अैाद्योगिक, सर्व उच्चदाब व लघुदाब (कृषी वगळून) वीज ग्राहकांना थकीत व चालू वीज बिलांचा भरणा करण्यासाठी हप्त्यांची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, खंडीत वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्याची संधी ग्राहकांना मिळाली आहे. तात्पुरता अथवा कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेले ग्राहक, वीज चोरी अथवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील ग्राहकांनाही या योजनेत सहभागी होता येईल.
उच्चदाब ग्राहकांना मंडल कार्यालय, २० किलोवॅटपेक्षा अधिक वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांना विभागीय कार्यालय आणि २० किलोवॅट पर्यंत वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांना उपविभागीय कार्यालयात अर्ज करता येईल.
चालू वीज बिलाच्या रक्कमेचे हप्ते बांधून देण्याबाबत वीज ग्राहकांच्या अर्जावर सात दिवसात, वीज पुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार ग्राहकांच्या अर्जावर १५ दिवसांत कार्यवाही केली जाणार आहे. कृषी ग्राहक वगळता इतर वर्गवारीतील उच्च व लघुदाब ग्राहकांना चालू वीज बिलाची रक्कम भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा आहे. त्यासाठी अगाऊ रक्कम भरण्याची गरज नाही. या ग्राहकांना १२ हप्त्यांची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
तात्पुरता वीज पुरवठा खंडित होऊन सहा महिने उलटले असल्यास पुर्नजोडणी शुल्क भरुन वीज पुरवठा सुरु करता येईल. मात्र, त्या पेक्षा अधिक कालावधीपासून वीज पुरवठा खंडित असल्यास ग्राहकांना नवीन अर्ज करावा लागेल. त्यासाठीचे वीजजोडणी शुल्कही भरावे लागेल. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकीच्या व्याजाची पन्नास टक्के रक्कम माफ करणार आहे.
---
ऑनलाईन अर्ज करता येणार
वीज बिल थकबाकीचे हप्ते बांधून देण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर योजनेचे स्वतंत्र पोर्टल सुरु करत आहे. त्याद्वारे ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याचे महावितरणने सांगितले.