पुण्यात वीज कोसळून दोघांचा बळी
By admin | Published: June 2, 2016 12:30 AM2016-06-02T00:30:28+5:302016-06-02T00:30:28+5:30
बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने आपल्या पहिल्याच तडाख्यात पुणे शहरामध्ये दोन बळी घेतले असून, वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी बंडगार्डन
पुणे : बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने आपल्या पहिल्याच तडाख्यात पुणे शहरामध्ये दोन बळी घेतले असून, वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी बंडगार्डन भागातील विधानभवन परिसरात घडली.
गौतम लक्ष्मण वीर (वय ५०, रा. सेंट्रल गव्हर्न्मेंट कॉलनी, आकुर्डी) व बालय्या मार्क सिडतल्ला (वय ६२, रा. घोरपडी) अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली तेव्हा रस्त्याने जात असलेले गौतम आणि बालय्या हे दोघेही विधानभवनाजवळील एका झाडाखाली थांबले. पोलीस चौकीशेजारीच असलेल्या या झाडावर अचानक वीज पडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघाजणांना तातडीने पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. तपासणी दरम्यान डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केले.
पोलिसांना दोघांच्याही खिशातील कागदपत्रांमधून तसेच मोबाइलमधून नातेवाइकांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांच्याही नातेवाइकांशी संपर्क साधला. रात्री उशिरा बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोघांचेही नातेवाईक जमा झाले होते. (प्रतिनिधी)