थकीत बिलांमुळे वीज कनेक्शन तोडलं, संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 08:29 PM2021-08-14T20:29:42+5:302021-08-14T20:31:47+5:30
मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी, यापुढे वीजजोड तोडल्यास आंदोलनाचा इशारा
सांगवी : कृषी पंपासह सर्वच वर्गवारीतील थकबाकी असणाऱ्या ग्राहकांच्या वीजजोड तोडण्याच्या आदेशानंतर सांगवी,शिरवली,खांडज,कांबळेश्वर येथील विद्युत वीजजोड तोडण्याच्या कारवाई विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत महावितरण कर्मचारी व अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक होऊन अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला.
गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने बारामती परिसरात पाठ फिरवली आहे.परिणामी खरीप पिकावर मोठ्या प्रमाणात फटका बसला. शेतकऱ्यांनी घेतलेले सोयाबीनचे पीक पाण्या अभावी जळून चालले आहे. उसाची पिके देखील आता जळण्याच्या मार्गावर आहेत. सुदैवाने धरण परिसरात झालेल्या पावसामुळे नदीला चांगल्या प्रकारे पाणीसाठा आहे. परंतु, शेतकऱ्यांची थकबाकी असल्याने ट्रान्स्फॉर्मर सोडवल्यामुळे पाणी असून ही शेतकरी हतबल झाले आहेत.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सांगवी येथील महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत वाद घातला.सरकारने जाहिर केलेली कृषी संजीवनी योजनेत शेतकरी सहभागी होण्यास तयार आहेत. या योजनेत सहभागी होण्याची मुदत मार्च २०२२ आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची गंभीर परिस्थीती असल्यामुळे विद्युत अधिकारी यांना अपेक्षित असलेली थकीत रक्कम देण्यासाठी शेतकरी असमर्थ आहेत. यामुळे उसाची तोडणी होईपर्यंत,किंवा सोयाबीनचे पीक निघेपर्यंत महावितरणने मुदतवाढ द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. परंतू, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आल्यामुळे आम्ही मुदतवाढ देण्यासाठी असमर्थ असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातून शेतकरी आणि महावितरण अधिकाऱ्यांच्या शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून वाद मिटविण्याचा प्रयत्न झाला. शेतकरी ऐकण्यास तयार नव्हते. जर यापुढे देखील विद्युत वीज तोडची भूमिका अशीच राहिली तर उग्र आंदोलन,रास्ता रोको व उपोषण या मार्गाचा अवलंब करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.