वीज यंत्रणेची कामे होईनात, आडमुठेपणाची महावितरणवर वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 06:23 AM2017-11-18T06:23:59+5:302017-11-18T06:24:13+5:30
दर वर्षी सुमारे १० टक्के विजेची मागणी व वीजग्राहकांची संख्या वाढत असल्याने पुणे शहरात विविध योजनांच्या माध्यमातून महावितरणने वीज यंत्रणेचे विस्तारीकरण व सक्षमीकरण सुरू केलेले होते.
पुणे : दर वर्षी सुमारे १० टक्के विजेची मागणी व वीजग्राहकांची संख्या वाढत असल्याने पुणे शहरात विविध योजनांच्या माध्यमातून महावितरणने वीज यंत्रणेचे विस्तारीकरण व सक्षमीकरण सुरू केलेले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून खोदाई शुल्काच्या तिढ्यामुळे पुणे शहरातील नवीन वीज यंत्रणेच्या विस्तारीकरणाचे व सक्षमीकरणाचे काम जवळजवळ ठप्प आहे. अस्तित्वात असलेल्या वीज यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. वीजपुरवठा खंडित होणे, वीजपुरवठ्याची पयार्यी व्यवस्था उपलब्ध नसणे किंवा भार व्यवस्थापन शक्य न होणे आदी प्रश्न निर्माण झाले आहेत.
पुणे शहरात ओव्हरहेड वीजतारा टाकण्याऐवजी भूमिगत वाहिन्या टाकण्याचे कामे विविध योजनांत प्रस्तावित करण्यात आले होते. शहरात प्रस्तावित ४ उपकेंद्रांची उभारणी पूर्ण झालेली आहे. परंतु, पालिकेने खोदाईसाठी परवानगी न दिल्यामुळे तसेच खोदाई शुल्काच्या तिढ्यामुळे बाणेर व शिवाजीनगरमधील ही उपकें्रदे अद्यापही कार्यान्वित होऊ शकलेली नाहीत.
खोदकामाच्या परवानगीसाठी महिनोन् महिने लागत असल्याने कामे थांबली आहे. नोव्हेंबर २०१२मध्ये पुणे महापालिकेने केवळ १,५०० रुपये प्रतिरनिंग मीटर असलेले खोदाई शुल्क २,६०० रुपये केले. त्यानंतर एप्रिल २०१३मध्ये ते दोन हजार रुपये करण्यात आले. नंतर मे २०१४मध्ये ज्या रस्त्यांवर पीव्हीसी किंवा आरसीसी पाईप टाकण्यात आले आहेत, तेथील खोदकामासाठी तब्बल ५,९५० रुपये व ज्या ठिकाणी डक्ट नाहीत तेथे रस्ते खोदाई करून भूमिगत वाहिनी टाकण्यासाठी ५,५४७ रुपये खोदाई शुल्क निश्चित करण्यात आले.
नागरिकांच्या दबावामुळे मे २०१५मध्ये पुणे महापालिकेने महावितरणसाठी २,३०० रुपये प्रतिरनिंग मीटर खोदाई शुल्क मंजूर केले. इतर शासकीय कंपन्यांना ५,५४७च्या खोदाई शुल्कात ५० टक्के सूट दिली होती. त्याप्रमाणे महावितरण हा खर्च स्वत: सोसून आतापर्यंत ही कामे सुरू होती. परंतु, जून २०१७मध्ये पुन्हा खोदाई शुल्कात ठराव घेऊन फेरबदल करण्यात आले. त्यानुसार रिइन्स्टेटमेंट शुल्कापोटी प्रतिरनिंग मीटर २,३५० रुपये दोन वर्षांसाठी अनामत रक्कम देणे, रिइन्स्टेंटमेंटची कामे करून देणे व दोन वर्षांच्या कालावधीत हे काम खराब झाल्यास किंवा खचल्यास त्यासाठी येणारी दुरुस्तीची रक्कम अनामत रकमेतून वळती करणे. तसेच, पुणे महापालिकेला ५,५४७ रुपये प्रतिरनिंग मीटरनुसार ११ टक्के रक्कम सुपरव्हिजन चार्जेस म्हणून देणे, अशी सध्या खोदाई शुल्काची आकारणी करण्यात आलेली आहे. सध्याच्या खोदाई शुल्कानुसार महावितरणला ६१०.१० रुपये सुपरव्हिजन चार्जेस तसेच खोदाईनंतरच्या रिइन्स्टेंटमेंटचा खर्च सुमारे २,३०० असे एकूण २,९१० रुपये प्रतिरनिंग मी. खोदाई शुल्क आकारण्यात आले. तसेच, प्रतिरनिंग मीटर २,३५० रुपये दोन वर्षांसाठी अनामत ठेवावी लागणार आहे. त्याप्रमाणे सद्य:स्थितीत प्रतिरनिंग मीटरसाठी सुमारे ५,२०० रुपयांचा सुरुवातीचा खर्च करावा लागणार आहे, जे महावितरणला शक्य नाही.