विजेचे भारनियमन शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:11 AM2020-12-22T04:11:25+5:302020-12-22T04:11:25+5:30
शेलपिंपळगा: खेडच्या पूर्व भागात विजेचे होत असलेले भारनियमन शेतकऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीचे होत असून उपलब्ध वेळेतही वारंवार विजेचे झटके सहन ...
शेलपिंपळगा: खेडच्या पूर्व भागात विजेचे होत असलेले भारनियमन शेतकऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीचे होत असून उपलब्ध वेळेतही वारंवार विजेचे झटके सहन करावे लागत आहेत. विशेष म्हणजे परिसरात बिबट्यांचे वास्तव्य असल्याने रात्री - अपरात्री घराबाहेर पडण्यास शेतकरी धजावत नाही. त्यामुळे भारनियमन त्वरीत रद्द करून दिवसा अखंडीत वीज द्या अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून खेड तालुक्यात कृषीपंपासाठी दिल्या जाणाऱ्या विजेचे सुमारे बारातासांहून अधिक वेळ भरनियमन करण्यात येत आहे. त्यातच भारनियमनाच्या वेळा दिवसा असल्याने रब्बी हंगामतील पीक सिंचनाच्या दृष्टीने त्या अधिक गैरसोयीच्या ठरत आहेत. सलग बारातासांहून अधिक वेळ होणाऱ्या भारनियमनामुळे शेलपिंपळगाव, शेलगाव, बहुळ, सिद्धेगव्हाण, दौंडकरवाडी, कोयाळी - भानोबाची, वडगाव - घेनंद, मरकळ, गोलेगाव, सोळू, साबळेवाडी, मोहितेवाडी, भोसे, चिंचोशी आदी गावांमधील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करून पर्यायी मार्गाने पिकांचे सिंचन करावे लागत आहे.
पूर्व भागातील बहुतांशी सर्व गावांमधील विद्युत जणित्रांमधील फ्यूज पेट्या व त्यातील आवश्यक तारा निकामी झाल्या आहेत. परिणामी विजेच्या दाबाने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पुन्हा तो सुरळीत करण्यासाठी मोठी पराकष्टा करावी लागत आहे. एकीकडे वीज कंपनी ग्राहकांकडून भरमसाठ विजेची वीजबिले आकारते. मात्र त्यांच्याकडून जनित्रांची दुरुस्ती करण्याबाबत उदासीनता समोर येत आहे. त्यामुळे त्याच्याही दुरुस्तीचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. वाढते तसेच गैरसोयीचे भारनियमन रद्द करुन शेतक-यांना पुर्णत: किमान दिवसा दहा तास अखंडीत वीज देण्याची मागणी पीक उत्पादक शेतकरी तसेच विविध संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
चौकट :
भरनियमनाव्यतिरिक्त आलेली वीज वारंवार खंडित होत आहे. कधी - कधी विद्युत जनित्रात बिघाड होतो; तर कधी जनित्रावर दाब येऊन त्यातील फ्यूज उडले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करून स्वता:च जीव धोक्यात घालून वायरमनची भूमिका पार पाडावी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
२१शेलपिंपळगाव
खेडच्या पूर्व भागातील विद्युत जनित्रांमधील फ्यूज पेट्यांची झालेली दुरवस्था. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)