भारनियमनाविरोधात संताप!, विद्युतपंपांची सलग १६ तास वीज गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 06:41 AM2017-10-07T06:41:06+5:302017-10-07T06:41:16+5:30

ऐन दिवाळीच्या तोंडावर भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आॅक्टोबर हीटमध्ये सुरू असलेल्या भारनियमनामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

Electricity is missing 16 hours in electricity | भारनियमनाविरोधात संताप!, विद्युतपंपांची सलग १६ तास वीज गायब

भारनियमनाविरोधात संताप!, विद्युतपंपांची सलग १६ तास वीज गायब

googlenewsNext

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये विजेचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला असून, विद्युतपंपाच्या विजेचे सलग १६ तासांहून अधिक काळ भारनियमन केले जात आहे. तसेच, भारनियमनाव्यतिरिक्त उपलब्ध असलेली वीजही वारंवार खंडित होत असल्याने विजेचा विषय शेतकºयांच्या दृष्टीने डोकेदुखीचा बनू लागला आहे. याविरोधात संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकºयांनी भोसे येथील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले.
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बहूळ, कोयाळी भानोबाची, मोहितेवाडी, शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, शेलगाव, साबळेवाडी, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, गोलेगाव, वडगाव घेनंद, भोसे, नवीनगाव आदी गावांमध्ये मागील सात-आठ महिन्यांपासून विद्युत पंपाच्या विजेचे दिवसा १६ तास भारनियमन सुरू आहे. भारनियमन तसेच विजेच्या लपंडावाला बळी पडणारी ही गावे बारमाही पिकांच्या उत्पादनात अग्रेसर असून सलग होणाºया भारनियमनामुळे या गावांमधील रब्बी हंगामातील कांद्याच्या लागवडी तसेच अन्य पिकांच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भोसे येथे शुक्रवारी (दि. ७) शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी विजेच्या समस्या निवेदनाद्वारे मांडण्यासाठी गेले असता, कार्यालयातील अधिकाºयांनी पळ काढला. निवेदन स्वीकारण्याचे धाडस केले नाही. अखेर शेतकºयांनी आक्रमक भूमिका घेऊन कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, रोहिदास दौंडकर, सुभाष पवळे, उपसरपंच एकनाथ आवटे, रवींद्र आवटे, संदीप पोटवडे, वस्ताज दौंडकर, कांताराम लोणारी, बबनराव दौंडकर, दत्ता सोनवणे, कैलास आरगडे, रामदास आवटे आदींसह अन्य आंदोलक शेतकरी उपस्थित होते.

अठरा तासांचे भारनियमन कमी करण्यासंदर्भात महावितरण कंपनीकडे शेतकरी वारंवार विनवणी करीत आहेत. मात्र, कंपनीकडून पूर्ण क्षमतेने वीज देण्यासंदर्भात कोणत्याही ठोस उपाययोजना आखल्या जात नसल्याने शेतकºयांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे ऐन रब्बी हंगामातील कांदालागवडीचे आव्हान शेतकºयांसमोर उभे राहिले आहे.

भारनियमनाविरोधात संताप!
बारामती : ऐन दिवाळीच्या तोंडावर भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आॅक्टोबर हीटमध्ये सुरू असलेल्या भारनियमनामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
बारामती शहरात किरकोळ भारनियमन सुरू आहे. बारामती शहर व एमआयडीसी परिसरात एकूण ८ वीजवाहिन्या आहेत. त्यांपैकी ७ वाहिन्या ए गटात व अवघी एक वाहिनी सी गटात आहे. त्यामुळे शहराला भारनियमनाचे जास्त चटके बसले नाहीत. शहरातील सी वाहिनीवरील केवळ थोड्या भागात सकाळी व दुपारी या दोन टप्प्यांत ४.४५ तास भारनियमन झाले. तर, उर्वरित शहर ए गटात असल्याने सकाळी ६ ते ७.३० या वेळेत केवळ दीड तास भारनियमन करावे लागले, अशी माहिती महावितरणच्या अधिकाºयांनी दिली.
बारामती मंडलातील वाणिज्यिक व वितरण हानी जास्त असलेल्या वाहिन्यांवरील वीजग्राहकांना जास्त भारनियमनाचा फटका बसला. मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या ६ तालुक्यांत ११२ वीजवाहिन्या आहेत. यात ए गटात ११, बी गटात ४, सी गटात १७, डी गटात १८, ई गटात २०, एफ गटात ८, जी-१ गटात ७, जी-२ गटात ६ व जी-३ गटात २१ वीजवाहिन्यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या टप्प्यात ए गटात ३.१५ तास, बी- ४ तास, सी-४.४५ तास, डी-५.३० तास, ई-६.१५ तास, एफ-७ तास, जी-१ मध्ये ७.४५ तास, जी-२ मध्ये ८.३० तर जी-३ या गटात ९.१५ तास भारनियमन होते.

वीज नसल्याने दुर्गम भाग चाचपडतोय
भोर : शहरात व ग्रामीण भागात दररोज सकाळी २ तर सायंकाळी २ असे ४ तासांचे भारनियमन करण्यात येणार आहे. शिवाय दर तासाला अधुनमधुन वारंवार वीज गायब होत आहे. वीजपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देताच वारंवार खंडित होत होता.
भोर शहरात सकाळी ९.३० ते ११.४५ व दुपारी ३.३० ते ६ वाजेपर्यंत भारनियमन तर ग्रामीण भागात सोमवार ते गुरुवार सकाळी ७ ते ९.३० तर दुपारी २.४५ ते ५, शुक्रवार ते रविवार सकाळी ९.३० ते ११.४५ व दुपारी ३.३० ते ६ या वेळात भारनियमन करण्यात येणार आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावे भोरपासून ६० ते ७० किमी अंतरावर असून सध्या पावसाचे दिवस आहेत. वादळी वाºयासह पावसामुळे झाडांची पडझड होऊन वीजवाहक तारा तुटतात. अनेक खांब वाकतात आणी वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. १० गावांना मिळून एक
वायरमन आहे. अनेक गावांत पावसाळ्यात महिनामहिना वीजपुरवठा नसतो. तुटलेल्या तारा जोडणे, खांब उभे करणे, ही कामे तर कधीच वेळेवर होत नाहीत. त्यामुळे दुर्गम डोंगरी गावातील लोकांना रात्ररात्र अंधारातच काढावी लागते.

Web Title: Electricity is missing 16 hours in electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे