बिजली...! सौरप्रकाशात उजळली पदरवाडी
By Admin | Published: May 5, 2017 02:22 AM2017-05-05T02:22:10+5:302017-05-05T02:22:10+5:30
श्रीक्षेत्र भीमाशंकरपासून सुमारे ५ किमीवर पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर खोल डोंगरदरीत वसलेल्या पदरवाडीला रिचर्स फाउंडेशन
कांताराम भवारी / डिंभे
श्रीक्षेत्र भीमाशंकरपासून सुमारे ५ किमीवर पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर खोल डोंगरदरीत वसलेल्या पदरवाडीला रिचर्स फाउंडेशन व आखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून १ मे रोजी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून येथील प्रत्येक घरात सौरदिवे बसविण्यात आले आहेत. यामुळे वर्षानुवर्षे अंधारात जीवन कंठणाऱ्या येथील आदिवासींची घरे सौर प्रकाशाच्या उजेडात उजाळून निघाली आहेत.
श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या पश्चिमेला खोल दरीत सुमारे १४ ते १५ आदिवासींची घरे असणारी पदरवाडी. भीमाशंकर अभयारण्यातून रास्ता काढत या वस्तीवर जावे लागते. खालच्या बाजूने उंच कोकण कडा व वरील बाजूनेही डोंगराचा मोठा भाग मध्येच निर्माण झालेल्या माचीमध्ये (डोंगराचा सपाट भाग) गेल्या अनेक वर्षांपासून पदरवाडीची लोक आपले जीवन कंठीत आहे.
या वस्तीवर जाण्यासाठी कोणत्याच बाजूने रस्ता नाही व भविष्यात होण्याची चिन्हे नाहीत. उदरनिर्वाहासाठी येथील नागरिकांना सुमारे पाच कि.मी.चढन चढून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे यावे लागते.
शिडीचा घाट उतरून येथील गावकरी खाली कोकणात जातात. खोल दरीतून उतरण्यासाठी येथे पायऱ्या पायऱ्यांची शिडी लावण्यात आली असून येथून ये-जा करणे अतिशय धोकादायक आहे. मुंबई व कोकणमार्गे काही पर्यटक भीमाशंकरला येण्यासाठी याच शिडी मार्गाचा वापर करत असताना पाहावयास मिळते.
दुर्गम भागात वसलेल्या या पदरवाडीस वर्षानुवर्षापासून लाईटची कोणत्याच प्रकारची सोय नसल्याने पदरवाडीची जनता अंधारात दिवस काढत होती. काही वर्षापूर्वी येथे सौर प्रकाशावर चालणारे दिवे बसविण्यात आले होते. मात्र, प्रत्येक घरात लाईट नव्हती. रिसर्च फौंडेशन पुणे यांच्या माध्यमातून १ मे रोजी महाराष्ट्र व कामगारदिनाचे औचित्य साधून येथील १४ घरांमध्ये सौर दिवे बसण्यिात आले आहेत.
यामुळे वर्षानुवर्षे अंधकारमय जीवन कंठणाऱ्या पदरवाडीच्या नशिबी असणारा अंधकारमय जीवन काही अंशी प्रकाशमय होण्यास मदत झाली आहे.