बिजली फुलांचे भाव कडाडले; शेतकऱ्यांचा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 12:31 AM2018-09-15T00:31:57+5:302018-09-15T00:32:26+5:30
गणेश चतुर्थीपासून बिजली फुलांचे बाजारभाव वधारल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार
गराडे : गेल्या आठवड्यात बिजली फुलांच्या घसरलेल्या बाजारभावामुळे पुरंदर तालुक्यातील बिजली उत्पादक आर्थिक संकटात सापडला होता. परंतु गणेश चतुर्थीपासून बिजली फुलांचे बाजारभाव वधारल्याने शेतकºयांना आर्थिक फायदा होणार आहे.
यंदा पुरंदर तालुक्यात बिजली फुलांची शेती चांगलीच फुलली आहे. बिजली उत्पादक शेतकºयांनी केलेली काळजीपूर्वक देखभाल, स्वच्छ हवामान यामुळे बिजली फुलांचे प्रचंड उत्पादन झाले आहे. आवक वाढल्यामुळे बिजली फुलांचे बाजारभाव कोसळले होते. त्यामुळे बिजली उत्पादक शेतकºयांना आर्थिक तोटा सहन करावा लागला.
पुरंदर तालुक्याला खेटून लगतच पुणे शहराची फुलांना मोठी बाजारपेठ असल्याने बिजली फुलांची चांगली विक्री होऊन नफा मिळतो. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील शेतकरी शेतात राबून बिजली फुलांचे मळे फुलवितात.
दिवे गावाजवळील जाधववाडी येथील सातत्याने बिजली फुलांचे उत्पादन घेणारे प्रगतिशील शेतकरी दांपत्य छबनराव जाधवराव व सुनंदा जाधवराव म्हणाले, की दरवर्षी बिजली फुलांचे चांगले पैसे मिळतात. त्यामुळे प्रपंचाला हातभार लागतो. परंतु यंदा मात्र बिजली फुलांचे मळे खूप चांगले येऊनदेखील बाजारभाव कोसळल्यामुळे सगळा तोटाच झाला होता. परंतु गणेश चतुर्थीपासून बिजलीचे बाजारभाव वाढल्याने चांगले पैसे मिळतील, अशी आशा आहे.
गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील फूल व्यापारी प्रदीप लोळे म्हणाले, की यंदा आवक वाढल्यामुळे बिजली फुलांचे बाजारभाव कोसळले होते. १ किलो बिजली ३० ते ४० रुपयाने कशीबशी विकली जात होती. त्यामुळे शेतकºयांना तोटा सहन करावा लागत होता. गणेश चतुर्थीपासून १ किलो बिजलीचे बाजारभाव ९० ते ११० रुपयांपर्यंत वाढले आहेत.