शेतीपंपांची वीज केली बंद
By admin | Published: April 28, 2017 05:50 AM2017-04-28T05:50:03+5:302017-04-28T05:50:03+5:30
नवीन मुठा उजव्या कालव्यामधून भर उन्हाळ्यात पाण्याचे चौथे आवर्तन सुरू करण्यात आल्यानंतर, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना
यवत : नवीन मुठा उजव्या कालव्यामधून भर उन्हाळ्यात पाण्याचे चौथे आवर्तन सुरू करण्यात आल्यानंतर, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी निर्बंध घालण्यात आल्याने शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पंपांचे वीज कनेक्शन काढण्यात आल्याने शेतकरी हतबल झाला असून, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळाल्यानंतर, दौंड तालुक्यात पाणी दिले जाणार आहे; मात्र दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पंपांचे वीज कनेक्शन तोडताना हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांचे पंप मात्र सुरू आहेत.
हा दुजाभाव केला जात असल्याचे शेतकरीवर्गातून सांगितले जात आहे. भर उन्हाळ्यात पिके जळून चालली असल्याने शेतकरीवर्ग पाटबंधारे विभागाच्या कारभारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
आणखी १५ दिवस शेतीला पाणी न मिळाल्यास यावर्षीदेखील हाताची पिके जाण्याचा धोका आहे. कालव्याच्या शेवटच्या टोकापासून पाणीपुरवठा करण्याचा नियम अनेक वर्ष जुना आहे. सदर नियमात तथ्य असले, तरी यावर काही उपाययोजना न केल्यास मागील वर्षी दुष्काळाने पिके नव्हती, यंदा परत पिके जळाल्यास शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे.
जुन्या कालव्यातून शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने तालुक्यातील काही शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटला आहे. नवीन कालव्यातील आवर्तनांचे नियोजन झाले असेल, तरी तालुक्यात शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायावर आवाज उठविण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)