पुणे जिल्ह्यातील विद्युत पुरवठा पूर्ववत : महावितरणची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 01:34 PM2019-08-08T13:34:44+5:302019-08-08T13:38:31+5:30
पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने महावितरण प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले..
पुणे : धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुठा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या भागांना फटका बसल्याने पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील सुमारे साठ हजार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. नदीतील पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम हाती घेत, बुधवारी (दि. ७) दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरू करण्यात यश मिळविले. मात्र, कृषी पंपाचा वीज पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही.
महावितरणच्या तांत्रिक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळपासून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे बाणेर व बोपोडीतील ४ व रास्ता पेठ येतील ७ रोहित्रांचा वीजपुरवठा बुधवारी सायंकाळपर्यंत सुरळीत करता आला नाही. ४० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा नागरिकांच्या सुरक्षतेसाठी खंडित करावा लागला. त्यामुळे औंध, बाणेर, बालेवाडी, बावधन, खडकी, बोपोडी, पीएमसी बिल्डिंग परिसर, जुनी सांगवी, मधुबन सोसायटी, पिंपळे गुरव, चिंचवड, संजय गांधीनगर, कासारवाडी, वाकड, कस्पटे वस्ती, पवनानगर, पिंपळे निलख, काळेवाडी, शिवतीर्थ, विश्रांतवाडी, वडगावशेरी, कोंढवा, पिसोळी, मांजरी व मुंढवा परिसर अंधारात गेला. मुळशी तालुक्यातील गावे, पूर्व हवेलीतील भाग, उरुळी कांचन, मांजरी, आष्टापूर, रीहे, पौड, लोणी व थेऊर या भागातील बत्ती गुल्ल झाली होती.
.....
मंगळवार संध्याकाळपासून पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने महावितरण प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. रात्रीच्या वेळेस काम करून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत होते. त्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत बहुतांश भागातील विद्युत पुरवठा सुरळीत केला.