बावीस पंपांचा वीजपुरवठा खंडित
By admin | Published: March 18, 2017 04:34 AM2017-03-18T04:34:50+5:302017-03-18T04:34:50+5:30
बारामती तालुक्याच्या ३ गावांतील २२ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींवरील विद्युत पंपाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे ५० ते ६० हजार लोकांचा पाण्याचा प्रश्न
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्याच्या ३ गावांतील २२ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींवरील विद्युत पंपाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे ५० ते ६० हजार लोकांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ग्रामपंचायतींकडे ६२ लाख २१ हजार रुपये थकीत आहेत. वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी, निंबूत, सोरटेवाडी, करंजेपूल, करंजे, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी आणि वाकी ग्रामपंचायतीचा त्यामध्ये समावेश आहे.
महावितरणच्या सासवड विभागीय कार्यालयाच्या पथकाने कारवाई केली. यापूर्वीदेखील वीजपुरवठा खंडित केला होता. त्यानंतर ग्रामपंचायतींनी १० ते २० हजार रुपयांची बाकी भरली. मात्र, वीजबिल थकीत लाखो रुपयांमध्ये आणि बाकी भरली जात आहे. सोमेश्वर महावितरणअंतर्गत ६२ लाख रुपयांची पाणीपुरवठा थकबाकी आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे सहायक अभियंता राजेंद्र पाठक, सोमेश्वर विभागाचे सहायक अभियंता विक्रम घोरपडे, कनिष्ठ अभियंता अभिजित बिरनाळे, सचिन साळुंखे, शंकर गोसावी यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. बारामती तालुक्यातील वाणेवाडी, मुरूम आणि वाघळवाडी, निंबूत, करंजेपूल, करंजे, सोरटेवाडी, वाकी, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी या सर्वच ग्रामपंचायतींना सधन ग्रामपंचायती म्हणून ओळखले जाते. मात्र, या ग्रामपंचायतीने अनेक वर्षांपासून विद्युत विररण कंपनीचे जवळपास ६२ लाख २१ हजार रुपये वीजबिल थकविले आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडे वारंवार पाठपुरवा करूनही वीजबिल भरले नाही.
एकूण २२ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींवरील विद्युत पंपांचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे आता तिन्ही गावांतील २५ ते ३० हजार कुंटुंबांना पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतींकडे धाव घेतली आहे. (वार्ताहर)
वाणेवाडी : ३ लाख ११ हजार, १ लाख १२ हजार, ४ लाख ४६ हजार आणि १ लाख ९६ हजार.
मुरूम : ३ लाख ४८ हजार आणि ५ लाख ७४ हजार अशी दोन विद्युत पंपाची
वाघळवाडी : २ लाख आणि १ लाख १२ हजार दोन विद्युत पंपाची बिल.
निंबूत : ५ पाणीपुरवठा विहिरींची १२ लाख रुपये, खंडोबाचीवाडी : २ पाणीपुरवठा विहिरींची ९ लाख.
गडदरवाडी : एक पाणीपुरवठा विहिरींचे २ लाख ६३ हजार रुपये.
सोरटेवाडी : एका पाणीपुरवठा विहिरीचे ३ लाख ६८ हजार.
करंजेपूल : दोन पाणीपुरवठा विहिरींचे ४ लाख ४५ हजार रुपये.
करंजे : एका पाणीपुरवठा विहिरीचे ४ लाख ७२ हजार रुपये.
वाकी : एका पाणीपुरवठा विहिरीचे २ लाख ७४ हजार रुपये थकबाकी आहेत.