...तर वीजपुरवठा होणार खंडित; पुणे परिमंडळात वीजबिलांची थकबाकी ३९६ कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 02:09 PM2017-10-26T14:09:25+5:302017-10-26T14:14:27+5:30
पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात वीज ग्राहकांची थकबाकी ३९६ कोटी रुपयांवर गेली आहे. या थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषीपंपधारक वीज ग्राहकांची थकबाकी ३९६ कोटी रुपयांवर गेली आहे. या थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव व मुळशी तालुक्यामध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून तत्काळ वीज बील भरण्याचे आवाहन मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनी केले आहे.
पुणे परिमंडलामध्ये ६ लाख ८४ हजार ५६७ ग्राहकांकडे १७० कोटी रुपयांची थकबाकी असून यातील ५ लाख ८१ हजार ३४० घरगुती ग्राहकांकडे १०७ कोटी ३९ लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील ८९ हजार ७२० ग्राहकांकडे ४३ कोटी ६१ लाख तर १३ हजार ५०७ औद्योगिक ग्राहकांकडे १९ कोटी १५ लाख रुपयांची थकबाकी आहे. यासोबतच ८४ हजार ८० कृषीपंपधारकांकडे तब्बल २२६ कोटी ६३ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदार कृषीपंपधारकांनी एप्रिल २०१७ पासूनच्या चालू वीजबिलांचा भरणा केला नसल्यास कृषीपंपाचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
पुणे, पिंपरी, लोणावळा, चाकण, तळेगाव आदी शहरांसह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झालेले आहेत. याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.