एकाच दिवसात १.५९ कोटींच्या वीजचोऱ्या उघड, महावितरणचा वीज चोरांना दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 09:23 AM2024-01-10T09:23:58+5:302024-01-10T09:24:25+5:30

वीज चोरी व अनधिकृतपणे वीज वापर केल्याप्रकरणी संबंधितांना दंड व नवीन वीज बिल देण्यात येत आहे....

Electricity theft of 1.59 crores exposed in a single day, Mahavitran crackdown on electricity thieves | एकाच दिवसात १.५९ कोटींच्या वीजचोऱ्या उघड, महावितरणचा वीज चोरांना दणका

एकाच दिवसात १.५९ कोटींच्या वीजचोऱ्या उघड, महावितरणचा वीज चोरांना दणका

पुणे : वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी महावितरणकडूनवीज चोरीविरोधी मोहीम राबविण्यात येत असून, एकाच दिवशी १ हजार २७६ ठिकाणी १ कोटी ५९ लाख रुपयांच्या अनधिकृत वीज वापराचे प्रकार उघडकीस आले. वीज तारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार करून ८६९ ठिकाणी ९६ लाख ५८ हजार रुपयांची थेट वीज चोरी झाल्याचे आढळून आले आहे.

पुणे प्रादेशिक विभागाअंतर्गत पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत शनिवारी (दि. ६) एकाचवेळी वीज चोरीविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी वर्गवारीतील वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ६५३ ठिकाणी १ कोटी २१ लाख ८४ हजार, सातारा जिल्ह्यात १५१ ठिकाणी १२ लाख ३४ हजार, सोलापूरमध्ये १७० ठिकाणी ८ लाख २९ हजार, कोल्हापूर जिल्ह्यात १३४ ठिकाणी ७ लाख ३ हजार व सांगली जिल्ह्यात १६८ ठिकाणी ९ लाख ६१ हजार, अशा एकूण १ हजार २७६ ठिकाणी १ कोटी ५९ लाख ११ हजार रुपयांचा अनधिकृतपणे वीजवापर उघडकीस आला.

वीज चोरी व अनधिकृतपणे वीज वापर केल्याप्रकरणी संबंधितांना दंड व नवीन वीज बिल देण्यात येत आहे. या बिलाचा ताबडतोब भरणा करावा, अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महावितरणने दिला आहे. भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार वीज चोरीच्या गुन्ह्यासाठी दंड व तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. सध्या वीज बिलांच्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज जोडण्यांची तपासणी सुरू आहे. यामध्ये अन्य ठिकाणाहून थकबाकी असलेल्या ठिकाणी वीजवापर होत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येत आहे.

Web Title: Electricity theft of 1.59 crores exposed in a single day, Mahavitran crackdown on electricity thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.