हाकेवस्तीवर वीज आली, स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर प्रथमच दिवाबत्ती झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 11:30 PM2018-08-30T23:30:31+5:302018-08-30T23:43:42+5:30
कष्टकऱ्यांची वस्ती प्रकाशली : विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होणार मदत
सोमेश्वरनगर : गेल्या पिढ्यांपिढ्या अंधारात काढलेल्या करंजे (ता. बारामती) येथील हाके वस्तीवर स्वतंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज आल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. करंजे (ता. बारामती) येथेही सोमेश्वर देवस्थान शेजारी एका टेकडीवर हाके वस्ती बसली आहे. बहुतांश समाज धनगर, मेंढरं सांभाळने आणि थोडीफार शेती हाच प्रमुख उपजीविकेचे साधन, येथे राहणार समाजच मुख्य प्रहवाहापासून बाजूला पडला गेला तो आज तागायत, सध्याची नवीन पिढी मुख्य प्रवाहात आली. आपल्या पण घरात लाईट असावी असे स्वप्न पाहू लागला.
महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थ्यांना वीज नसल्याने अभ्यासात अडथळा येऊ लागला, पिण्याच्या पाण्या सारख्या समस्या भेडसावू लागल्या, वस्तीवरील संतोष हाके, बाजीराव पांडुळे, सागर हाके, रोहिदास धायगुडे यांच्यासह काही युवक एकत्र येतात, आणि वस्तीवर वीज आणण्यासाठी धडपडू लागतात, गेल्या १५ ते २० वर्षांपासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळ्यांचे उंबरे झिजवले पण यश काही आले नाही, शेवटी सोमेश्वर उपविभागीय अभियंता सचिन म्हेत्रे आणि निरा ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता सचिन साळुंखे यांच्या पुढाकारातून या वस्तीवर उजेड फुलवण्यात आला, ३५ लोकांची ही वस्ती असून या ठिकाणी सहा विजेचे खांब टाकण्यात आले आहेत.
‘लाईट’ आल्याचे समाधान
बाबूराव हाके (वय ८५) : जन्मापासून या ठिकाणी लाईटच नव्हती, वयाची ८५ वर्षे अंधारात काढली, पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तरी लाईट आल्याने समाधान वाटत आहे.
अनुसया हाके (७०) : जशी लग्न करून आली तशी इथं लाईट नाही, समदं आयुष्यच अंधारात गेलं.
आता अकरावीला आहे, पहिलीपासून दिव्याखालीच अभ्यास करून शिकलो, लाईट आल्याने अभ्यासाचा प्रश्न मिटला आहे.
-विजय डोंबळे, महाविद्यालयीन युवक
नीरा ग्रामीण-महावितरणच्या सौभाग्य योजने अंतर्गत या वस्तीवर वीज दिली आहे, या योजनेत शून्य टक्के डिपॉझिट असते आणि नागरिकांकडे जी काही कागदपत्रे असतात त्यावर ही योजना देता येते.
- सचिन साळुंखे,
कनिष्ठ अभियंता