विजेची कामे लागली मार्गी
By admin | Published: January 20, 2016 01:24 AM2016-01-20T01:24:29+5:302016-01-20T01:24:29+5:30
महावितरणने ‘एक गाव एक दिवस’ संकल्पनेमुळे बारामती मंडलातील वीज यंत्रणेसंबंधीच्या अनेक समस्या मार्गी लागण्यास मदत झाली आहे
बारामती : महावितरणने ‘एक गाव एक दिवस’ संकल्पनेमुळे बारामती मंडलातील वीज यंत्रणेसंबंधीच्या अनेक समस्या मार्गी लागण्यास मदत झाली आहे. मंडलामध्ये नोव्हेंबर महिन्यापासून सुमारे दीड हजाराहून अधिक कामे झाली आहेत.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असताना गावोगावी वीज पोहोचली. अनेक गावांत तीस ते चाळीस वर्षे जुनी यंत्रणा आहे. कमकुवत तारा, झिजलेले खांब, उघडे फ्यूज बॉक्स यामुळेच ग्रामीण भागात विद्युत अपघाताच्या घटनांचा धोका वाढला होता. शेतातून जाणाऱ्या वीजवाहक तारांच्या घर्षणामुळे ऊस जळाल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली.
याबाबत सातत्याने महावितरणकडे तक्रारी होत होत्या. वाढत्या तक्रारी आणि समस्यांची गंभीर दखल घेत महावितरणने ‘एक गाव एक दिवस’ संकल्पना राबबून त्या गावातील वीज यंत्रणेसंबंधीच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती मंडलात ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या मंडलातील बारामती, इंदापूर, दौंड, भोर, शिरूर, पुरंदर आदी तालुक्यांत कामे सुरू आहेत. या मोहिमेत रोहित्राच्या पेट्या दुरुस्त करणे, किटकॅट, वीज खांब बदलणे, सैल वीजवाहिन्यांचे गाळे ओढणे, उच्च दाब वाहिनीस तसेच लघुदाब वाहिनीस गार्डिंग करणे, नादुरुस्त मीटर बदलणे, कायमस्वरूपी वीज खंडित झालेल्या ग्राहकांची पडताळणी करणे, शून्य ते तीस युनिट वीजवापर असलेल्या ग्राहकांची तसेच मीटर रीडिंग उपलब्ध नसलेल्या ग्राहकांची तपासणी करणे, वीजचोरी व अनधिकृत वीजवापराची प्रकरणे उघडकीस आणणे, वीजबिलाची थकबाकी वसूल करणे, वाहिन्यांच्या गाळ््यांना स्पेसर बसविणे, लघुदाब वाहिनीस जंपरिंग करणे, रोहित्र बदलणे, नवीन वीजजोड देणे, वीजवाहक तारा बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती करणे आदी कामे यांमधून करण्यात येत आहेत.
या मोहिमेत अधीक्षक अभियंता केशव सदाकळे, कार्यकारी अभियंता मधुकर घुमे, मदन शेवाळे, शिवाजी वायफळकर यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते व जनमित्रांनी सहभाग घेतला.