वीज बिलासाठी महिलेचा बळी; तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून कोयत्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2024 04:49 PM2024-04-24T16:49:57+5:302024-04-24T16:50:30+5:30
तरुणाने घरातील वीज मिटरचे वीज बील जास्त प्रमाणात येत असल्याच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही म्हणून महिलेवर कोयत्याने वार केले
सुपे (बारामती) : वीज बील जास्त येते, घरच्या वीज मीटर त्वरीत तपासावा अशी मागणी करत महावितरणने दुर्लक्ष केल्याने एका तरुणाने वीज उपकेंद्रात जाऊन जाब विचारत असताना तेथे असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मोरगाव येथे सकाळी ११ च्या दरम्यान घडली. मात्र महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
अभिजीत पोटे ( रा. मोरगाव ) असे कोयत्याने वार केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी यास त्वरीत ताब्यात घेवुन गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत रिंकु राम थिटे ही मोरगाव वीज उपकेंद्रातील महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असुन उपचारासाठी पुण्याकडे हलविण्यात आले होते. मात्र पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, मागिल आठ दिवसापुर्वी पोटे याने वीज उपकेंद्रात तक्रार दाखल केली होती. यावेळी त्यांच्या घरातील वीज मिटरचे वीज बील जास्त प्रमाणात येत होते. त्यामुळे वीज मीटर त्वरीत तपासण्यात यावा याबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असे त्याला वाटल्याने त्याने चिडून जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी ( दि. २४ ) सकाळी ११ च्या दरम्यान जाब विचारला. यामध्ये रिंकू राम थिटे ही तांत्रिक कर्मचारी महिला त्याच्याशी बोलत असताना त्याने रागाने तिच्यावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार केले. यात महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली. तिच्यावर पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यु झाला. अधिक तपास सुपे पोलिस स्टेशनचे सपोनी नागनाथ पाटील करीत आहेत.