पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मास्कमध्ये बसवले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस; पिंपरीतील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 07:15 PM2021-11-19T19:15:11+5:302021-11-19T20:20:40+5:30
तपासणीत मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवल्याचे समोर आले. त्यामध्ये एक सिमकार्ड देखील मिळून आले आहे
पिंपरी : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत एका परीक्षार्थीने मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. पिंपरी- चिंचवडच्या पोलीस आयुक्तालया अंतर्गत ७२० जागांसाठी शुक्रवारी लेखी परीक्षा घेण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील ८० केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. परीक्षा केंद्रावर आलेल्या उमेदवारांची तपासणी सुरू होती. त्यावेळी आरोपी उमेदवाराच्या मास्कचे वजन जास्त असल्याचे एका पोलिसाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी मास्कची तपासणी केली. तपासणीत मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवल्याचे समोर आले. त्यामध्ये एक सिमकार्ड देखील मिळून आले आहे. दरम्यान, आरोपी उमेदवाराने परीक्षा केंद्रावरून पळ काढला. त्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरा पर्यंत सुरू होती. अशी माहिती पोलीस निरिक्षक बालकुष्ण सावंत यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलिसांच्या ७२० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यासाठी पहिला टप्पा म्हणून लेखी परीक्षा होत असून राज्यभरातून तरुणांनी अर्ज सादर झाले होते. लेखी परीक्षेत परीक्षार्थींनी दुपारी एकपासून केंद्रावर हजर राहणे आवश्यक होते. हॉलतिकिट, सध्याचा फोटो असलेले ओळखपत्र, आवश्यक आहे. कॉपी तसेच डमी परीक्षार्थी, असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंगबरोबरच कडक तपासणीही होणार होती. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली होती. पाच केंद्रांसाठी एक भरारी पथक असून पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी व इतर तीन पोलीस, असे चार जणांचा या प्रत्येक पथकात समावेश होता.