रांजणगावात होणाऱ्या क्लस्टरचा छोट्या-मोठ्या पूरक व्यवसायांनाही फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 10:28 AM2022-11-03T10:28:31+5:302022-11-03T10:33:26+5:30
या इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरमुळे जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या पूरक व्यावसायिकांनाही त्याचा फायदा ...
रांजणगाव गणपती (पुणे) :पुणे जिल्हाच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये केंद्र सरकारच्या मंजुरीने इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या प्रकल्पाच्या माध्यमातून पाच हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार असून, या इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरमुळे जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या पूरक व्यावसायिकांनाही त्याचा फायदा होईल.
रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त नागरिक व स्थानिक तरुणांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. या प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पात इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह होम अपलायन्ससारख्या वस्तूंचे उत्पादन घेण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या मंजुरीने रांजणगाव पंचतारांकित एमआयडीसी परिसरात हा प्रकल्प होणार असून, या प्रकल्पामध्ये स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवता येईल. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक होणार असून, प्रकल्पग्रस्त नागरिक व स्थानिक तरुणांना नोकरी व या इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर कंपन्यांना छोटे-मोठे पूरक व्यवसाय मिळून स्थानिक तरुणांना रोजगार व स्वयंरोजगार मिळतील.
रांजणगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक तीनमध्ये केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्पाचे स्थानिक युवकांनी स्वागत केले असून, या इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना सामावून घेऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध व्हाव्यात, अशा अपेक्षा स्थानिक नागरिक व युवक, तसेच रांजणगाव एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे.
शिरूर तालुक्यात शासनाच्या कौशल्य विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या शासकीय, तसेच शासनमान्य खाजगी संस्थांचे आयटीआय व एच.एस.सी. व्होकेशनल (१२ वी व्यवसाय अभ्यासक्रम) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी, तसेच रोजगार व स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरचा चांगला फायदा होईल, असे डॉ. के.सी. मोहिते यांनी सांगितले.