मिनिटामध्ये केवळ दोन-तीन वेळाच श्वासोच्छ्वास घेतो हत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:12 AM2021-09-24T04:12:47+5:302021-09-24T04:12:47+5:30
हत्ती हा सर्वच धर्मांमध्ये पवित्र प्राणी मानला जातो. गणेशालाच हत्तीचे मुख बसविले गेल्याने हिंदू धर्मात तर हत्तीला गणेशाचे रूप ...
हत्ती हा सर्वच धर्मांमध्ये पवित्र प्राणी मानला जातो. गणेशालाच हत्तीचे मुख बसविले गेल्याने हिंदू धर्मात तर हत्तीला गणेशाचे रूप मानले जाते. अनेक गणेश मंदिरात हत्ती ठेवल्याचे आपल्याला दिसते. गीतामध्ये सुद्धा श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले की, हत्तीमध्ये मी ऐरावत आहे. हत्तीचे आयुर्मान साधारण शंभर वर्षे इतके असते. गंमत म्हणजे हा इतका अजस्त्र प्राणी एका मिनिटामध्ये केवळ दोन ते तीन वेळाच श्वास घेतो आणि सोडतो. मात्र, हत्ती इतका प्रचंड असला तरी एक छोटीशी मुंगीही हत्तीच्या कानात शिरली तर हत्तीला ठार करू शकते. त्यामुळेच हत्ती चालतानाही अनेक वेळा सोंडेने फुंकून फुंकून जमिनीवर पाऊल ठेवतो. जमिनीवरही अगदी संथगतीने हलत-डुलत चालणारा हा हत्ती पाण्यामध्ये असाच पोहू शकतो. हत्तीला गंध घेण्याची क्षमताही तीव्र असते. त्यामुळे पाण्याचा गंध हत्तीला चार ते पाच किमी लांबून ओळखता येतो. इतर प्राण्यांच्या तुलनेत हत्तीची बुद्धी ही जास्त असते. त्यामुळे तो त्याच्या साथीदारांना किती वर्षांनी भेटला तरी लगेच ओळखू शकतो, असं सांगितलं जातं. हत्ती हा प्रेमळ प्राणी असल्यामुळे हत्तीच्या कळपात सहसा भांडणे दिसत नाहीतच. हत्तीची कातडी साधारण एक इंच जाड असते. गंमत म्हणजे हत्ती हा दिवसा सुमारे चार तास उभ्यानेच झोपतो.