हत्ती दिन विशेष! हत्ती पूर्वी १२० वर्षे जगायचा, आता जगतो ८० वर्षे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 03:47 PM2022-08-12T15:47:51+5:302022-08-12T15:48:02+5:30
खाल्लेले गवत दुसऱ्या दिवशी ‘हत्ती’च्या तोंडात जशाला तसेच राहते!‘ऐने अकबरी’त मनोरंजक गोष्टी
श्रीकिशन काळे
पुणे : हत्ती हा धिप्पाड आहे. तो अतिशय संवेदनशील आहे. माणसाला ज्या भावना असतात, त्याच त्यालाही असतात. माणसासारखे तो १२० वर्षांपर्यंत जगू शकतो; परंतु हे आयुष्यमान हत्तीला अकबर बादशाहच्या काळात होते. आता हत्तीचे वय साधारण ८० च्या जवळपास आहे. २०१७ मध्ये भारतात २७ हजार हत्ती होते. हस्तिदंतासाठी त्यांची हत्या केली जाते. आता ही संख्या अजून कमी झाली असेल. पूर्वी भारतात लाखो हत्तींची संख्या होती. ती आता काही हजारांवर आली आहे.
चारशे वर्षांपूर्वी अकबर बादशहाकडे ५ हजार हत्तींची फौज होती. लढाईसाठी हत्तीचा वापर होत असे. अकबर बादशहाच्या दरबारातील अबुल फजल याने त्यावेळच्या प्राण्यांविषयीच्या गोष्टी ‘ऐने अकबरी’मध्ये नोंद केल्या आहेत. सोळाव्या शतकातील हे वर्णन मनोरंजक तर आहेच; पण ते लिहिणाऱ्याला कसे आणि कुठून प्राप्त झाले, ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे.
४१ व्या ऐनमध्ये अकबराचा चरित्रकार अबुल फजल लिहितो की, संगीताचे काही आलाप हत्ती असे काही लक्षात ठेवतो की, संगीताशी परिचित असलेल्या एखाद्या जाणकाराच्याच फक्त लक्षात राहू शकतात ! हत्तीला संगीताच्या सुरांची व तालांची चांगली जाण असते. तो पाय हलवून लयबध्द हालचाली करू शकतो. रणांगणावर असताना हत्ती धनुष्यातून बाण मारू शकतो, बंदूकही चालवू शकतो, जमिनीवर पडलेल्या वस्तू सोंडेने उचलून माहुताकडे देऊ शकतो. खाल्लेले गवत दुसऱ्या दिवशी तोंडाद्वारे बाहेर काढू शकतो आणि ते त्या गवतात कोणताही बदल झालेला नसतो. (गवतावर रासायनिक प्रक्रिया झालेली नसते).
आता भारतात किती हत्ती ?
भारत सरकारच्या पर्यावरण विभागातर्फे जाहीर एका अहवालानुसार २०१७ मध्ये भारतात केवळ २७ हजार ३१२ हत्ती होते. गेल्या ५ वर्षांमध्ये त्यात लक्षणीय घट झाली. २०१२ मध्ये ही संख्या ३१,७११ होती.
''हत्ती हा वैभवाचे, संपन्नतेचे लक्षण मानतो. पूर्वी लढाई करण्यासाठी हत्तीचा वापर होत असे. आपल्याकडे आता हत्ती कमीच आहे. हत्ती पोसणे कमी नाही. अकबर बादशाहच्या दरबारातील अबुल फजलने ‘ऐने अकबरी’ हा पारसीमध्ये ग्रंथ लिहिलेला. तो नंतर इंग्रजीत आला आणि मराठीत मी ‘इतिहासातील प्राणिविश्व’ नावाने प्रसिध्द केला. त्यात तेव्हाच्या हत्तीविषयीच्या अनेक मनोरंजक गोष्टी नमूद आहेत. - महेश तेंडुलकर, इतिहास संशोधक व इतिहासातील प्राणिविश्व पुस्तकाचे लेखक''
''हत्तीच्या तोंडात एका बाजुला गवत किंवा पाणी साठवून ठेवता येते. पोटात गेल्यानंतर अनेकदा गवत विष्ठेतून जशाला तसे बाहेर येते. त्यावर रासायनिक प्रक्रिया होत नाही. आता सोंडेतून पाणी बाहेर काढताना पाहता येते. - डॉ. सुचित्रा सूर्यवंशी, पशूवैद्यकीय अधिकारी''