अकरा गुन्हेगार दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 06:56 PM2021-03-26T18:56:38+5:302021-03-26T19:17:25+5:30
गेल्या वर्षभरात तडीपारीची कारवाई केलेल्या गुन्हेगारांची संख्या झाली साठ
पिंपरी: शहरात कायदा सुव्यवस्था रहावी यासाठी अधिकाधिक गुन्हेगार गजाआड राहतील अथवा शहरापासून ते दूर राहतील याची काळजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून घेतली जात आहे. शहरातील अकरा सराईत पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात तडीपारीची कारवाई केलेल्या गुन्हेगारांची संख्या साठ झाली आहे.
गुन्हेगारी मुक्त पिंपरी चिंचवड या मोहिमेअंतर्गत पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी ४९ गुन्हेगारांना मागकत्या वर्षी तडीपार केले. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) ५ टोळ्यांमधील २३ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. म्हणजेच मोक्का आणि तडीपरी अंतर्गत ७२ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
आता भोसरी पोलीस ठाण्यातील 3, चाकण, आळंदी आणि दिघी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 2, चिंचवड आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा अकरा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
शकील कासीम शेख (वय २४, रा. कासारवाडी), अमोल शांताराम नितोने (वय २०, रा. भोसरी), रवींद्र उर्फ गोट्या बन्सीलाल भालेराव (वय २२, रा. भोसरी), ओंकार मच्छिंद्र झगडे (वय २४, रा. चाकण), रोहन महेंद्र घोगरे (वय २२, रा. चाकण), गौरव धर्मराज भूमकर (वय २३, रा.खेड), दिगंबर उर्फ दिग्या विठ्ठल कदम ( वय 30, रा. आळंदी), राहुल एकनाथ धनवडे (वय २१, रा.चऱ्होली), महेंद्र रवींद्र वाघमारे (वय ४५, रा. बोपखेल), वीरेंद्र उर्फ भोलेनाथ सोनी (वय २०, चिंचवड), सागर आत्माराम गायकवाड (वय २४, मोशी) अशी तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या सर्व आरोपींना २६ मार्चपासून दोन वर्षांसाठी शहर आयुक्तालय, पुणे पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस हद्दीतून तडीपार केले आहे.
मोक्का अंतर्गत सात टोळ्यांमधील ४७ गुन्हेगार जेरबंद
पोलिसांनी मागील वर्षात सात गुन्हेगारी टोळ्यांमधील ४७ गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. अजून तीन टोळ्यांमधील ३२ गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर एका सराईत गुन्हेगारावर झोपडपट्टी दादा कायद्यांर्गत (एम पी डी ए) कारवाई करण्यात येणार आहे.