वाघोलीतील एक किमी रस्त्यासाठी अकरा कोटी पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:59+5:302021-07-17T04:09:59+5:30
--- सुरेश वांढेकर वाघोली : केवळ तेराशे मीटर रस्त्याच्या समस्या सोडविण्यासाठी तब्बल अकरा कोटी रुपयांचे काम मंजूर करून त्या ...
---
सुरेश वांढेकर
वाघोली : केवळ तेराशे मीटर रस्त्याच्या समस्या सोडविण्यासाठी तब्बल अकरा कोटी रुपयांचे काम मंजूर करून त्या कामात प्रचंड दिरंगाई होत आहे. पाण्यासारखा पैसा खर्च करूनसुद्धा ना रस्ता व्यवस्थित झाला, ना फुटपाथ ना येथील वाहतूककोंडी सुटली. त्यामुळे वाघोलीकरांच्या पदरी निराशा आली आहे. या साऱ्या गोष्टींकडे ग्रामपंचायतीतील पदाधिकारी, सदस्यांपासून आमदार, खासदारांनीही ब्र शब्द काढला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुणे-नगर महार्गावरील वाघोली (ता. हवेली) येथील वाहतूककोंडीची सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. तब्बल सुमारे अकरा कोटी रुपयातून केवळ तेराशे मीटर लांबीचा रस्त्याचे रुंदीकरणाचे हे काम गेल्या तीन वर्षांपासून पूर्ण झाले नाही. या निधीतून वाघेश्वर मंदिर चौक ते केसनंद फाटा (भावडी रोड) दरम्यान रस्ता रुंदीकरण, चौक रुंद करणे, पावसाळी गटार लाइन, अतिक्रमण काढून फुथपाथ बसवणे, रस्त्यात येणारे लाईटचे खांब हलविणे, रस्ता दुभाजकसह सुशोभीकरण तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावणे या कामांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश आहे.
पीएआरडीच्या माध्यमातून वाघोलीतील हे रोडचे काम आर. के. कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आहे. मात्र कामाची मुदत संपूर्ण देखील काही ठिकाणी काम अर्धवट झाले आहे. अनेक काही ठिकाणी फुटपाथवर चेकर्स बसवले गेले नाहीत तर काही ठिकाणीचे चेकर्स उडून गेले. काही ठिकाणी पावसाळी गटार लाइनचे चेंबर आत गेले आहेत. भावडी रोड चौकांमध्ये रस्ता दुभाजकदेखील पडला आहे, झाडे तर फक्त लावल्याचा दिखावा केला आहे, लावलेल्या झाडांपैकी एकही झाड जिवंत नाही. असे असतानाही पीएमआरडीएचे अधिकारी या कामाकडे 'अर्थ' पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. आता तर टाटा, व्होडाफोन, एअरटेल, तसेच विद्युत, लाईन गॅसलाईन अशा खासगी कंपन्यांनी केबल टाकण्याचे काम करताना या फुटपाथची व रस्त्यांची पुरती वाट लावली आहे. अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असूनदेखील पीएमआरडी अधिकारी या कामाकडे दुर्लक्ष करत असून स्थानिक प्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुन्हा वाघोलीमध्ये वाहतूककोंडीची भर पडण्यास सुरुवात होऊन छोटे मोठे अपघात घडत आहेत. अशा निकृष्ट काम करणाऱ्या व त्यांच्या पाठीशी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
--
पीएमआरडीचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांनी सर्वसामान्य जनतेच्या कररूपी पैशातून रस्त्यासाठी खर्च केलेल्या अकरा कोटी रुपयांचा अक्षरश: चुराडा केला आहे त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांची खातेनिहाय चौकशी करा, अन्यथा मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल.
सर्जेराव वाघमारे, पंचायत समिती सदस्य, हवेली
**************
चौकट
संबंधित काम करत असताना वाघोलीमधील एका ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याने आपल्या हद्दीत काम करुन देण्यास नकार दिल्याने त्या ठिकाणी देखील काम अपूर्ण राहिले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
***************
वाघोलीतील या टीचभर रस्त्यासाठी तब्बल तब्बल अकरा कोटी खर्च केले, मात्र झालेली कामे पाहिली तर ती एक कोटीमध्ये झालेल्या कामाच्या दर्जाइतकीसुध्दा नाहीत.
- शिवदास पवार, सामाजिक कार्यकर्ते.
***************
मला कामाच्या दर्जाबद्दलची माहिती अद्याप नेमकी नाही, स्वत: जाऊन पाहणी करेन, काम दर्जाहीन असेल तर कारवाई होईल.
- सुहास दिवसे (पीएमआरडी आयुक्त)
--
१६वाघोली रस्त्याचे काम