अकरावी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
By admin | Published: June 16, 2017 04:55 AM2017-06-16T04:55:06+5:302017-06-16T04:55:06+5:30
केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या इयत्ता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले आहे. अकरावीच्या प्रवेश अर्जाचा दुसरा भाग विद्यार्थ्यांना
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या इयत्ता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले आहे. अकरावीच्या प्रवेश अर्जाचा दुसरा भाग विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून भरता येणार आहे. अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ५ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे, तर चौथ्या फेरीची शेवटची गुणवत्ता यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाच्या आॅनलाइन अर्जाचा पहिला भाग २५ मेपासून भरण्यास सुरुवात झाली. गुरुवारपर्यंत ७२ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी अकरावीच्या अर्जाचा पहिला भाग भरला होता. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दुसऱ्या भागामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले गुण व महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरायचे आहेत. शुक्रवारपासून या अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे, त्यासाठी त्यांना २७ जून रोजी ४ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अकरावी अर्जाचा पहिला भाग भरला नाही, त्यांना तो आता भरण्याचीही सुविधा २७ जूनपर्यंत उपलब्ध असणार आहे.
महाविद्यालयांसाठी उपलब्ध असलेल्या २० टक्के कोट्यासाठी महाविद्यालयांकडे २७ जूनपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. २८ जून रोजी महाविद्यालये कोटा प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करतील. २८ जून व २९ जून रोजी कोटा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
२९ जून रोजी विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती तपासणीसाठी आॅनलाइन प्रसिद्ध केली जाईल. त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असल्यास ३० जून रोजी लेखी हरकती नोंदविता येणार आहेत. कोटा प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी ३० जून रोजी प्रसिद्ध होईल. महाविद्यालयांना १ जुलैपर्यंत कोटा प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर ५ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रकाशित होईल. शेवटची चौथी गुणवत्ता यादी २४ जुलै रोजी जाहीर होईल.
पसंतीक्रम काळजीपूर्वक भरावा लागणार
अकरावी प्रवेश अर्जामध्ये महाविद्यालयांचा पसंतीक्रम विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक भरावा लागणार आहे. यंदा विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे १० पसंतीक्रम भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे मागील वर्षीचे कटआॅफ विचारात घेऊनच त्यांनी पसंतीक्रम भरणे आवश्यक आहे.
विशेषत: पहिल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयाचे नाव टाकताना
अत्यंत काळजीपूर्वक टाकावे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय विद्यार्थ्यास मिळाल्यास त्याने त्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. त्याने तिथे प्रवेश न घेतल्यास त्याचा अर्ज प्रवेशप्रक्रियेतून बाद होणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील एकूण २६७ महाविद्यालयांतील तिन्ही शाखांच्या ९४ हजार ५८० जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये कला शाखेच्या १३ हजार ९०, वाणिज्य शाखेच्या ३६ हजार १८५, विज्ञान शाखेच्या ३७ हजार ४२० तर एमसीव्हिसीच्या ७८८५ जागा
उपलब्ध आहेत.
कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या एकूण प्रवेशक्षमतेच्या २० टक्के जागा त्यांच्या संस्थेतील दहावीत शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी इनहाऊस कोट्यांतर्गत उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयाच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के जागांचा कोटा उपलब्ध असेल.