पिंपरी चिंचवडमध्ये अकरा तासांनी आनंद सोहळ्याची सांगता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 03:00 AM2017-09-06T03:00:21+5:302017-09-06T03:01:37+5:30
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या . . .अशा जयघोषात, ढोल ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या निनादात, फुलांची उधळण करीत, सुमारे अकरा तासांच्या मिरवणुकीने उद्योगनगरी मध्ये गणरायाला निरोप देण्यात आला .
पिंपरी चिंचवड, दि. 6 - गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या . . .अशा जयघोषात, ढोल ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या निनादात, फुलांची उधळण करीत, सुमारे अकरा तासांच्या मिरवणुकीने उद्योगनगरी मध्ये गणरायाला निरोप देण्यात आला . डीजे आणि गुलाल विरहित मिरवणूक यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्टय़ होते.
पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतील सर्वात महत्त्वाची, आणि वैशिष्टय़पूर्ण अशी गणेश विसर्जन मिरवणूक चिंचवड परिसरातून निघत असते . चिंचवडमधील पवना नदी घाटावर सकाळी सात वाजल्यापासूनच घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात येत होते. दुपारी अडीच नंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका चिंचवडमधील चापेकर चौकात येऊ लागल्या. दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री नटरंग फेम सोनाली कुलकर्णी यांनी निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव येथे घरगुती गणपतीचे विसर्जन केले. यावेळी तिला पाहण्यासाठी मोठया प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती. सायंकाळी साडेसात पर्यंत मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांचे प्रमाण अत्यल्प होते . साडेआठनंतर मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे चौकात येऊ लागली .ढोल ताशांच्या निनादात, पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटात अपूर्व उत्साह दिसून आला . मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेश परिधान केलेल्या महिला पुरुष आधी भक्त सहभागी झाले होते त्याचबरोबर फुगडीचे खेळ रंगले होते. डीजे आणि गुलाल विरहित मिरवणूक यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्टय़ होते तसेच मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .
चाफेकर चौकामध्ये पुणे पोलिस आयुक्तालय तसेच पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता . महापौर नितीन काळजे आमदार लक्ष्मण जगताप, आयुक्त श्रावण हर्डीकर, सह आयुक्त दिलीप गावडे 'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर तसेच चिंचवड परिसरातील नगरसेवकांनी गणेशभक्तांचे स्वागत केले . गुलाला ऐवजी फुलांचा वापर अधिक प्रमाणात दिसून आला त्याचबरोबर मोहक फुलांचे रथ लक्ष वेधून घेत होते . तसेच मावळ मुळशी परिसरातील ढोल ताशा पथकांचा सहभाग लक्षणीय होता.
विविध शैक्षणिक, ऐतिहासिक , सामाजिक संदेश देणारे जिवंत हलते देखावे मंडळांनी तयार केले होते . रात्री साडेदहानंतर चौकांमध्ये येणाऱ्या चारही बाजूंकडून मोठ्या प्रमाणावर मंडळे आली . हा मंगलमय सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गणेशभक्तांची गर्दी झाली होती . या आनंद सोहळ्यांमध्ये सेल्फी घेण्यासाठी ही लगबग सुरू होते. रात्री बारापर्यंत अठ्ठेचाळीस मंडळांनी विसर्जन केले तर बारानंतर आठ मंडळांनी विसर्जन केले .
रात्री बारानंतर स्पीकरला बंदी असल्याने मिरवणुकीतील ढोल ताशांचा दणदणाट थांबला . सुमारे अकरा तासांनी म्हणजेच रात्री दीड वाजता या आनंद सोहळ्याची सांगता झाली . पोलीस मित्र संघटना, पोलीस नागरिक मित्र, संस्कार प्रतिष्ठान , नागरी हक्क कृती समिती प्राधिकरण समिती आदी सामाजिक कार्यकर्त्यांनीही आनंद सोहळा चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी मदत केली . मूर्तीदान उपक्रमाला ही मोठ्या प्रमाणावर गणेशभक्तांनी प्रतिसाद दिला .