पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल केला लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 07:45 PM2021-11-09T19:45:11+5:302021-11-09T19:55:32+5:30
पिंपरी : शहरात चोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच आहे. चोरीच्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. ...
पिंपरी : शहरात चोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच आहे. चोरीच्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. घरफोडी व चोरी प्रकरणी एमआयडीसी भोसरी, सांगवी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले. चनेज बहाद्दूर यादव (वय २०, रा. एमआयडीसी भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाज्यावाटे घरात प्रवेश केला. घरातून २० हजारांचा मोबाईल फोन आणि पाच हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. ७) रात्री एक ते पहाटे पाच या कालावधीत घडली.
आनंद बाबू धोत्रे (वय ४२, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील कपाटातून नऊ लाख ५५ हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. ७) रात्री आठ ते सोमवारी (दि. ८) सकाळी साडेसात या कालावधीत घडला.
अमोल लालू ठाकर (वय २६, रा. नवीन उकसान, नाने, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिरगाव येथील मंदिराच्या पाठीमागील बाजूला असलेल्या जिओ टॉवरमधून अज्ञात चोरट्यांनी ९० हजारांच्या तीन बॅटरी चोरून नेल्या. हा प्रकार रविवारी (दि. ७) रात्री सोमवारी (दि. ८) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास उघडकीस आला.