अकरावीच्या खुल्या संवर्गातील जागा वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:07 AM2020-12-02T04:07:16+5:302020-12-02T04:07:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयामधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी राबविली जात असलेली ऑनलाईन प्रवेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयामधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी राबविली जात असलेली ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून एसईबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे खुल्या संवर्गातील जागांमध्ये वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांना आता २९ हजार ८३५ जागांसाठी अर्ज करता येणार आहेत.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया खोळंबली होती. परंतु, राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशामुळे प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून एसईबीसी आरक्षणासाठी राखिव ठेवण्यात आलेल्या जागा आता खुल्या संवर्गात आल्या आहेत. त्यामुळे २० हजार ९१४ ऐवजी आता २९ हजार ८३५ जागांवर खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत.
इयत्ता अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी एसईबीसी संवर्गासाठी १० हजार ३६२ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी २ हजार ७७४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यातील १ हजार ४४१ विद्यार्थ्यांना एसईबीसी अंतर्गत प्रवेश मिळाला. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे उर्वरित ८ हजार ९२१ जागा खुल्या संवर्गासाठी उपलब्ध झाल्या. अनेक विद्यार्थ्यांनी एसईबीसी संवर्गातून प्रवेश मिळण्यासाठी अर्ज केला होता.आता या विद्यार्थ्यांना खुल्या संवर्गातून अर्ज करण्यासाठी संधी देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जातील कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम बदलले तर त्यांना आपल्या घराजवळील किंवा आवडीचे महाविद्यालय मिळू येऊ शकते.खुल्या संवर्गाच्या जागा वाढल्यामुळे विद्यार्थ्यी ऑनलाइन प्रवेश अर्ज अंतर्गत बदल करत आहेत, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.