अकरावी प्रवेशाचे शिक्षण विभागासमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:13 AM2021-08-12T04:13:49+5:302021-08-12T04:13:49+5:30
पुणे : अकरावी प्रवेशासाठी राज्य मंडळातर्फे घेतली जाणारी सीईटी परीक्षा न्यायालयाने रद्द केल्याने माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयासमोर अकरावी प्रवेशाचा ...
पुणे : अकरावी प्रवेशासाठी राज्य मंडळातर्फे घेतली जाणारी सीईटी परीक्षा न्यायालयाने रद्द केल्याने माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयासमोर अकरावी प्रवेशाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्यातील तब्बल ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर ६ लाख ४८ हजार ६८३ विद्यार्थ्यांना ७५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे सीईटीऐवजी केवळ इयत्ता दहावीच्या गुणांवर प्रवेश देणे शिक्षण विभागासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी दहावीच्या २०२१ च्या परीक्षेचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. इयत्ता नववी व दहावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. परिणामी बहुतांश विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळेच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी येत्या २१ ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. सीईटी परीक्षेसाठी राज्यातील तब्बल ११ लाख ९६ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामुळे सीईटीसाठी विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, परीक्षाच रद्द झाल्याने प्रवेशाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी सीईटी परीक्षेची तयारी करत होते. काही विद्यार्थ्यांनी हजारो रुपये खर्च करून सीईटीसाठी खासगी शिकवणी लावली होती. मात्र, सीईटी रद्द झाल्याने काही विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयात जाऊन बाजू मांडण्यात वेळ जाऊ शकतो. त्यामुळे शिक्षण विभागही न्यायालय निर्णयानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या मानसिकतेत आहे.
चौकट
कट ऑफ वाढल्याचा परिणाम
शेकडो विद्यार्थ्यांना दहावीत एकसारखे गुण मिळाले आहेत. त्यामुळे एखाद्या महाविद्यालयात ९९ ते ९५ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळू शकतो. तसेच नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांचा कट ऑफ वाढू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्याला गणित, विज्ञान किंवा इंग्रजी विषयातील एकूण गुण विचारात घेऊन प्रवेश दिला जाऊ शकतो. विद्यार्थ्याची जन्मतारीखही लक्षात घेतली जाऊ शकते, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
विभागीय मंडळनिहाय १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी
पुणे : ७९ , नागपूर : २५, औरंगाबाद : २६१ ,मुंबई : ३२ ,कोल्हापूर : ९२, अमरावती : १०५, नाशिक : ६१, लातूर : २७८ , कोकण : २४.