अकरावी प्रवेश प्रक्रिया जुलैअखेरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:54+5:302021-07-19T04:08:54+5:30
पुणे : राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू केली जाणार असून त्याबाबतचे वेळापत्रक ...
पुणे : राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू केली जाणार असून त्याबाबतचे वेळापत्रक येत्या दोन ते तीन दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्य मंडळातर्फे अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील मार्गदर्शक सूचना एक ते दोन दिवसात प्रसिध्द केल्या जाणार आहेत, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आला. मात्र, निकाल जाहीर झाला; आता अकरावी प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार? असा सवाल विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच प्रथमत: सीटीई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्य मंडळ व माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाने तयारी सुरू केली असून, लवकरच दोन्ही वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहेत.
माध्यमिक शिक्षण विभागातर्फे येत्या २६ ते २७ जुलैपासून महाविद्यालय नोंदणी व विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जातील पहिला भाग भरण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक दोन ते तीन दिवसांत प्रसिद्ध केले जाणार आहे. तसेच सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरण्याची संधी दिली जाईल, असे शिक्षण अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
राज्य मंडळातर्फे अकरावी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक एक ते दोन दिवसात प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे यांसारख्या शहरातील नामांकित शहरांमधील महाविद्यालयात प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटीची तयारी सुरू करावी लागणार आहे.
-----------------------
माध्यमिक शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाविद्यालय नोंदणी करणे व प्रवेश अर्जातील पहिला भाग भरणे ही प्रक्रिया सुरू होईल.
- दिनकर टेमकर, प्रभारी संचालक, माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य
-------------------------